
(नंदुरबार) महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयाकडून जिल्ह्यासाठी सन 2026-27 या वित्तीय वर्षाकरिता भौतिक व आर्थिक उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा कार्यालयामार्फत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू व पात्र लाभार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून, मुख्यालयाने दिलेले सर्व उद्दिष्ट 100 टक्के साध्य करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक एस. जी. तायडे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
महामंडळामार्फत जिल्ह्यातील ओबीसी समाजातील तरुण-तरुणी, महिला आणि उद्योजकांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्यासाठी बँका आणि थेट कर्ज स्वरूपात विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, इच्छुक उमेदवारांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
महामंडळामार्फत 20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना, थेट कर्ज योजना (रुपये 01 लक्ष पर्यंत), वैयक्तिक व्याज परतावा योजना (बँकेकडून रुपये 15 लक्ष पर्यंत), गट कर्ज व्याज परतावा योजना (बँकेकडून रुपये 10 लक्ष ते जास्तीत जास्त 50 लक्ष पर्यंत), शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना ( बँकेकडून रुपये 10 लक्ष ते जास्तीत जास्त 20 लक्ष पर्यंत), महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना. या योजना राबविण्यात येतात.
महामंडळाच्या सर्व योजनांची पारदर्शकता आणि सुलभतेसाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीवर आधारित आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी आवश्यक त्या सर्व वैध कागदपत्रांसह महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.msobcfdc.org भेट देऊन अर्ज दाखल करणे अनिवार्य आहे.
योजनांच्या अटी, शर्ती आणि आवश्यक कागदपत्रांच्या सविस्तर माहितीसाठी अर्जदारांनी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या., डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार येथे प्रत्यक्ष कार्यालयात संपर्क साधावा किंवा 02564-210062 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री. तायडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.