Home महाराष्ट्र रायगड जिल्ह्यातील ३१५ नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी – महिला व बालविकास मंत्री...

रायगड जिल्ह्यातील ३१५ नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Approval for 315 new Anganwadi centers in Raigad district – Women and Child Development Minister Aditi Tatkare

मुंबई : महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी “स्मार्ट अंगणवाडी किट” खरेदीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ३१५ अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून, या केंद्रांचे रूपांतर आदर्श आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त ‘स्मार्ट अंगणवाड्यां’मध्ये करण्यात येणार आहे.

या योजनेमुळे प्रत्येक अंगणवाडीत शिक्षण, आरोग्य, पोषण, स्वच्छता व बालसंगोपनासाठी आवश्यक असणारे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. केंद्रांमध्ये मुलांसाठी आनंददायी, सुरक्षित आणि शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यास मदत होईल.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, स्मार्ट अंगणवाडी योजनेमुळे राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील लहान मुलांना सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी शिक्षणाचे वातावरण उपलब्ध होईल. मुलांच्या सर्वांगीण  विकासासोबतच महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वाचा टप्पा ठरेल.

रायगड जिल्ह्यातील माणगाव, तळा, श्रीवर्धन, रोहा, म्हसळा, महाड, अलिबाग, पोलादपूर, कर्जत, खालापूर, सुधागड आणि पनवेल या सर्व तालुक्यांतील अंगणवाड्या या योजनेत समाविष्ट आहेत. यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील बालकांना दर्जेदार शिक्षण, पोषण आणि आरोग्यसेवा मिळणार असून स्थानिक अंगणवाड्या आधुनिक शिक्षण व आरोग्य विकासाचे केंद्र म्हणून विकसित होतील.

या प्रकल्पामुळे अंगणवाडी सेविकांना तंत्रज्ञानाधारित शिक्षण पद्धती व पोषण व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच, बालकांच्या वाढीचा, आरोग्याचा व पोषणस्थितीचा मागोवा घेण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर होईल. नवीन अंगणवाड्या बालकांचे पोषण, आरोग्य तपासणी व पूर्व-शिक्षण अधिक परिणामकारकपणे पार पाडतील. तसेच गर्भवती व स्तनदा महिलांना आरोग्य सेवा आणि पोषण मार्गदर्शन सुलभपणे उपलब्ध होईल.

महिला व बालविकास विभाग राज्यातील अंगणवाड्या सुसज्ज, आकर्षक आणि कार्यक्षम बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून ‘स्मार्ट अंगणवाडी योजना’ ही बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने उचललेले अत्यंत महत्त्वाचे आणि दूरदृष्टीचे पाऊल ठरणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version