Home महाराष्ट्र उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी

Basic Literacy and Numeracy Assessment Test under Ullas-Nav Bharat Literacy Programme

मुंबई – केंद्र शासन पुरस्कृत, ‘उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाची 2022 ते 27 या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार असाक्षरांना साक्षर करण्यासाठी अंमलबजावणी केली जात आहे. या कार्यक्रमांतर्गत सन 2025-26 मध्ये उल्लास ॲपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा रविवार दि. 29 मार्च 2026 रोजी राज्यात घेण्यात आली.

मराठी, हिंदी, इंग्रजी, ऊर्दू, गुजराती, कन्नड, तेलगू, तामिळ, बंगाली या नऊ माध्यमातून घेण्यात आलेल्या या परीक्षेतून निकषानुसार परीक्षार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून नवसाक्षरांना प्रमाणपत्र व गुणपत्रक एकत्रित देण्यात येणार आहेत. या चाचणीच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरुकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण ही जीवन कौशल्ये विकसित होण्यास मदत होणार आहे. तसेच त्या अनुषंगाने त्यांचे पुढील जीवनमान उंचावण्यास मदत होईल.

मागील वर्षी 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या परीक्षेत सुमारे पाच लाख असाक्षरांनी सदर परीक्षा दिली होती. तर केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यात नव्याने नोंदणी केलेल्या सुमारे 1.23 लाख इतक्या असाक्षर व्यक्तींपैकी सुमारे एक लाख असाक्षर व्यक्तींनी चाचणी परीक्षा दिली.

या परीक्षेच्या निमित्ताने शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त यांनी असाक्षरांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. ‘जिल्हा परीक्षा निरीक्षक’ म्हणून सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्यस्तरावरील सर्व शिक्षण संचालक, सहसंचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांच्यासह संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांनी भेट देऊन परीक्षांचे निरीक्षण केले तसेच परीक्षा घेणाऱ्या यंत्रणांना आणि परीक्षार्थींना प्रोत्साहन दिले. यानिमित्ताने असाक्षरांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्व यंत्रणांचे शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांनी आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!
Exit mobile version