नंदुरबार(प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ग्रामीण भागात विशेष कार्य करून यशस्वी उद्योग उभारणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी “ग्रामोद्योग भरारी पुरस्कार-2026” साठी नामांकने मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उद्योजकांनी आपले अर्ज 28 जुलै 2026 पूर्वी सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, राजेश गवांदे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
ग्रामीण भागात उद्योग उभे करून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणाऱ्या उद्योजकांना प्रेरणा देणे आणि त्यांचा यथोचित सन्मान करणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश असून संकल्पनेतून उद्योगाच्या वृद्धीला व गतीला चालना देण्यासाठी सन 2023 पासून सुरू झालेल्या या राज्यस्तरीय उपक्रमाचे यंदा चौथे वर्ष आहे. या पुरस्कार योजनेअंतर्गत राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार प्रदान केले जातात, तसेच काही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन गौरविले जाते. मंडळाच्या विविध योजनांतून अर्थसहाय्य घेऊन उद्योगाची यशस्वी उभारणी केलेल्या उद्योजकांसाठी ही एक उत्तम संधी आहे. अर्ज सादर करण्याची मुदत अंतिम 28 जुलै 2026 असून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पुरस्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यासाठीचे अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mskvib.org) तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील मंडळाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या जास्तीत जास्त यशस्वी उद्योजकांनी या पुरस्कारासाठी आपले नामांकन अर्ज मुदतीत सादर करावेत, असेही आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, गवांदे यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
