
नंदुरबार जिल्ह्यातील कारागिरांना शासकीय योजनांची माहिती मिळावी, त्यांना बाजारपेठेशी जोडण्याची संधी उपलब्ध व्हावी तसेच स्थानिक हस्तकलेला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने विकास आयुक्त (हस्तकला), वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्या वतीने ‘चौपाल’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे पार पडला. या उपक्रमात जिल्ह्यातील ८० हून अधिक कारागिरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाला हस्तकला सेवा केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथील सहाय्यक संचालक श्री. अमन कुमार तसेच हस्तकला प्रोत्साहन अधिकारी श्री. शैलेन्द्र सिंह यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमादरम्यान कारागिरांना कारागीर पहचान कार्ड (Artisan Pehchan Card) नोंदणी प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच नव्याने ओळख पटलेल्या कारागिरांची नोंदणीही करण्यात आली.
यावेळी कारागिरांना विविध विकासात्मक योजना, सामाजिक सुरक्षा उपक्रम, मुद्रा कर्ज, विपणन सहाय्य तसेच राष्ट्रीय व राज्य पुरस्कारांसाठी सहभागाची संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. भारताची समृद्ध हस्तकला परंपरा जपण्यासाठी आणि कारागिरांना सक्षम करण्यासाठी भारत सरकारच्या विकास आयुक्त (हस्तकला), वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्या विविध उपक्रमांची माहितीही देण्यात आली.
या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र (DIC), RSETI तसेच ट्रायबल अकॅडमीचे विद्यार्थी यांनीही सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना स्थानिक हस्तकलेचे जतन आणि प्रसार करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले. युवकांनी नव्या कल्पना, तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या माध्यमातून स्थानिक हस्तकला जागतिक बाजारपेठेत नेण्याची क्षमता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
पारंपरिक ‘चौपाल’ संकल्पनेतून प्रेरित हा उपक्रम कारागीर, प्रशासन आणि संबंधित विभाग यांच्यात थेट संवाद घडवून आणणारा ठरला. स्थानिक हस्तकला उद्योग, कौशल्य विकास आणि ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा देण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
#handicraftsofindia#RuralEntrepreneurship#SkillDevelopment#collectorofficenandurbar