Home आरोग्य जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

Health check-up camp at the District Collector's Office on the occasion of International Women's Day concluded with enthusiasm

नंदुरबार जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेले हे शिबिर जिल्हा रुग्णालय, नंदुरबार यांच्या वतीने पार पडले. महिला आरोग्याबाबत जनजागृती करणे, नियमित तपासणीचे महत्त्व पटवून देणे तसेच निरोगी जीवनशैलीचा संदेश देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयातील विविध विभागातील तज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरात जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला तसेच पुरुष कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली आरोग्य तपासणी करून घेतली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गणेश कासार, समुपदेशक DSRC, जिल्हा रुग्णालय यांनी केले. त्यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले. नियमित तपासणीमुळे अनेक गंभीर आजारांचे लवकर निदान होऊन वेळेत उपचार घेणे शक्य होते, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी मा. अप्पर जिल्हाधिकारी श्री. धनंजय गोगटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होणे ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. नियमित व्यायाम, संतुलित आहार, मानसिक ताण कमी ठेवणे आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे ही सुदृढ जीवनासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांनी स्वतःच्या आरोग्यास प्राधान्य दिल्यास संपूर्ण कुटुंब निरोगी राहते, असेही त्यांनी सांगितले.

मा. निवासी जिल्हाधिकारी सौ. आशा संघवी यांनी महिलांना उद्देशून सांगितले की, महिलांवर घर आणि नोकरीची दुहेरी जबाबदारी असते. त्यामुळे त्यांनी नियमित व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप आणि वेळेवर आरोग्य तपासणी करून निरोगी जीवनशैली अंगीकारणे गरजेचे आहे. महिला सुदृढ असतील तर समाजही सुदृढ राहील, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी श्री. तेजल माळी, समुपदेशक ICTC, जिल्हा रुग्णालय यांनी उपस्थितांना आरोग्य तपासणीचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी HIV, AIDS, Syphilis, Hepatitis B व C, TB, Cancer, Thyroid यांसारख्या आजारांविषयी सविस्तर माहिती देत लवकर निदान व नियमित तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले.

या शिबिरात स्त्रीरोग तज्ञ डॉ. उर्मिला भोये, त्वचारोग व गुप्तरोग तज्ञ डॉ. प्रीती पाडवी, नेत्ररोग तज्ञ डॉ. दीपक वसावे, कान-नाक-घसा तज्ञ डॉ. कपिल दुसेजा, दंतरोग तज्ञ डॉ. कल्पेश चव्हाण, जनरल फिजिशियन डॉ. रिजवान अन्सारी, बालरोग तज्ञ डॉ. कृष्णकुमार वळवी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. यावेळी विविध आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच आवश्यक त्या उपचारांबाबत सल्लाही देण्यात आला.

शिबिरादरम्यान कर्मचाऱ्यांची रक्त तपासणी करून HIV, Hepatitis B व C, Syphilis, Thyroid तसेच इतर आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. अनेक कर्मचाऱ्यांनी प्रथमच संपूर्ण आरोग्य तपासणी करून घेतल्याने या उपक्रमाचे विशेष स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी श्री. गोपाल गाडीलोहार, SSK मॅनेजर, जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी मा. उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन श्री. प्रमोद भामरे, मा. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती कल्पना ठुबे, श्रीमती सोनिया जहागिरदार (महसूल सहाय्यक अधिकारी), श्रीमती अस्मिता रघुवंशी (मंडळ अधिकारी), श्रीमती मीरा घुगे (महसूल सहाय्यक अधिकारी) यांनी विशेष सहकार्य केले. तसेच जिल्हा रुग्णालयातील कर्मचारीही तपासणीसाठी उपस्थित राहून शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले हे आरोग्य तपासणी शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले असून अशा प्रकारचे उपक्रम नियमितपणे आयोजित करावेत, अशी अपेक्षा उपस्थित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

Maha Arogya IEC Bureau

#internationalwomensday#healthcamp#womenhealth#PublicHealth#HealthAwareness#collectorofficenandurbar

error: Content is protected !!
Exit mobile version