वनसंवर्धनासाठी सामूहिक सहभाग आवश्यक;CFR व IFR क्षेत्र भेटीद्वारे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा ग्रामस्थांशी संवाद
Collective participation is necessary for forest conservation; District Collector Dr. Mittali Sethi interacts with villagers through CFR and IFR area visits
सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील कुंभरी येथे मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी वन व्यवस्थापन समिती सदस्यांसोबत संवाद साधत सामूहिक वनसंवर्धन, वृक्षलागवड आणि शाश्वत विकासाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी कुंभरी, निगदी, तेलखेडी, कात्रा, त्रिशूल, वेलखेडी, गोराडी, अट्टी, शेलगदा, रोषमाळ खुर्द, कात्री आदी गावांतील वन व्यवस्थापन समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येत्या पावसाळ्यात CFR क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नियोजनबद्ध वृक्षलागवड करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. “सामूहिक लाभ आणि सामूहिक प्रयत्न” या भावनेतून जल, जंगल आणि जमीन संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर Agro + Forestry + Horti या संकल्पनेवर आधारित वृक्षलागवड, वनआधारित उद्योग निर्मिती, Stakeholder Mapping, अभ्यास सहल आणि स्थानिक रोजगार निर्मितीसाठी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मिलेट इंडस्ट्रियल क्लस्टरप्रमाणेच Forest Based Enterprise उभारणीसाठीही मोठी संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
वन व्यवस्थापन समिती सदस्यांनीही CFR क्षेत्रासाठी पाणी स्रोत नियोजन, रोपवाटिका, जैविक कुंपण आणि संरक्षणासाठी सहकार्य मिळाल्यास सामूहिक वृक्षलागवडीला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कुंभरी येथील सामूहिक वनहक्क (CFR) क्षेत्रातील बांबू व मिश्र वृक्षलागवडीची पाहणी केली. तसेच वैयक्तिक वनहक्कधारक श्री. सेगा राज्या पटले यांच्या IFR क्षेत्राला भेट देत त्यांच्या मेहनतीने फुलवलेल्या आंबा, पेरू, बोर, सीताफळ, काजू, महू, साग व बांबू लागवडीचे कौतुक केले.
वनउपज तेंदूपत्ता संकलन प्रक्रियेचीही पाहणी करण्यात आली. ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने तेंदूपत्ता संकलन, वाळवण व पूड तयार करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांना समजावून सांगितली.
सामूहिक वनसंवर्धन, स्थानिक सहभाग आणि शाश्वत विकासाच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असून, वनाधारित रोजगार व पर्यावरण संवर्धनाला यामुळे नवी दिशा मिळणार आहे.