Home महाराष्ट्र निधीचा प्रभावी वापर करून विकासकामे गुणवत्तापूर्वक आणि वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री...

निधीचा प्रभावी वापर करून विकासकामे गुणवत्तापूर्वक आणि वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे

Complete development works with quality and on time by utilizing funds effectively – Guardian Minister Nitesh Rane

सिंधुदुर्गनगरी: जिल्ह्यातील विविध विकासकामांचा वेग वाढवून शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, तसेच मंजूर निधीचा पारदर्शक आणि परिणामकारक वापर करून विकासकामे गुणवत्तापूर्वक व निर्धारित मुदतीत पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले की, शासनाने उपलब्ध करून दिलेला निधी हा जनतेच्या विकासासाठी असून प्रत्येक रुपयाचा योग्य उपयोग होणे आवश्यक आहे. कामांची गुणवत्ता राखणे ही संबंधित यंत्रणांची जबाबदारी असून अपूर्ण किंवा निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच कामाच्या गुणवत्तेबाबत देखरेख समिती नेमावी असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा वार्षिक योजनेतील २८२ कोटी रुपयांचा निधी वितरण व खर्चामध्ये आपला जिल्हा राज्यात प्रथम स्थानी राहिला आहे. या निधीतून जिल्ह्यात विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. यावर्षी देखील आपल्याला अशीच कामगिरी करायची असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.

बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, कृषी, पर्यटन, ग्रामविकास, सिंचन आणि सार्वजनिक बांधकाम विभागांच्या कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी विकास कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्वक करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित कामांमध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी रस्ते, पाणीपुरवठा आणि वीज सुविधा यांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी विविध विभागांच्या कामांची माहिती सादर करताना मंजूर कामांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. विभागांमध्ये समन्वय ठेवून विकासकामे गतीने पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

error: Content is protected !!
Exit mobile version