
चरणसेवा उपक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर आणि स्वयंसेवक आपल्या आई वडिलांप्रमाणे भक्तीभावाने थकलेल्या वारकऱ्यांची चरणसेवा केली आणि त्यांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या. वारकऱ्यांच्या सेवेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भारताच्या युवा शक्तीचे चित्र, भारत आणि महाराष्ट्र धर्म पाहायला मिळतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत इतर दिंड्याकरिता शौचालयाची व्यवस्था करण्यात आली. वारी दरम्यान १३ लाख चौरस फूट जर्मन हँगर करण्यात आले. ५ हजार फिरती शौचालये देण्यात आली. वारीला निर्मलवारी करणारे स्वच्छतादूत हे देवदूतच आहेत. राज्यातील १४ जिल्ह्यात वारीच्या अनुषंगाने अतिशय उत्तम नियोजन करण्यात आले असून याबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले, असेही ते म्हणाले.
पंढरपूर येथील वाळवंट स्वच्छ करुन चंद्रभागा नदीचे पाणी स्वच्छ पोहोचविण्याच्यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे ३० ते ३५ लाख वारकरी पंढरपूर येथे आल्यानंतरही संपूर्ण पंढरपूर स्वच्छ दिसत आहे. वारीचा कालावधी संपल्यानंतरही पंढरपूर असेच स्वच्छ राहील, अशी अपेक्षा श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी लोकप्रतिनिधी, सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्हाप्रशासन, पोलीस प्रशासन, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, निर्मलवारीमध्ये विविध परंपरांच्या माध्यमातून जनजागृती करणारे कलावंत तसेच वारी यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे कामाचे कौतुक केले.
कार्यक्रमाला जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार राजेंद्र राऊत, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, विजयकुमार देशमुख, नारायण पाटील, नंदकिशोर महाजन, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, विभागीय आयुक्त शितल तेली-उगले, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक आदी उपस्थित होते.
#पंढरपूरवारी२०२६#आषाढीएकादशी#आषाढीवारी#पंढरीचीवारी#वारकरी#PandharpurWari2026#PandharpurDiaries