Home महाराष्ट्र धुळे व नंदुरबार जिल्हे भविष्यातील प्रमुख औद्योगिक केंद्रे बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र...

धुळे व नंदुरबार जिल्हे भविष्यातील प्रमुख औद्योगिक केंद्रे बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Dhule and Nandurbar districts will become major industrial centers of the future – Chief Minister Devendra Fadnavis

धुळे : शिरपूर तालुक्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल आणि अरुणावती नदीवर बंधारे बांधण्यास मान्यता देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या दीड वर्षात तब्बल ४० हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक आली असून, भविष्यात धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे राज्याची प्रमुख औद्योगिक केंद्रे बनतील, असा विश्वासही श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज दुपारी स्व. तपनभाई पटेल मेमोरिअल हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. त्यानंतर आर. सी. पटेल औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचलित विविध शैक्षणिक संस्था, औद्योगिक उपक्रमांचे उद्घाटन व‌ भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, आमदार शिरीष नाईक, आमदार राघवेंद्र पाटील, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राजेश पाडवी, आमदार मंजुळा गावित, आमदार आमश्या पाडवी, धुळ्याच्या महापौर माया परदेशी, माजी खासदार डॉ.सुभाष भामरे, डॉ. हीना गावित, शिरपूरचे नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, भुपेशभाई पटेल आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाने विकसित एआय आधारित ई-सुविधा पोर्टलचे लोकार्पण, आयुर्वेदिक कॉलेज, ॲग्रीकल्चर कॉलेज व फार्मसी कॉलेज, तरडी, आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल, निमझरीचे सुदूर यंत्रणेद्वारे उद्घाटन, खर्दे येथील वैद्यकीय महाविद्यालय  इमारत, नटवाडे येथील याहामोगा माता मंदिर, क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा स्मारक आणि क्रांतिवीर खाज्या नाईक स्मारक आणि दहिवदच्या मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे  भूमिपूजन करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्यानंतरच्या काळात अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबतच आता शिक्षण, आरोग्य व रोजगार या प्रमुख गरजा बनल्या आहेत. याच त्रिसूत्रीवर भर देत शिरपूरने साधलेला विकास राज्यासाठी दिशादर्शक आहे. एकविसाव्या शतकात उद्योग केवळ पैशावर नाही, तर कुशल मनुष्यबळावर चालतात. शिरपूरमध्ये उभारण्यात आलेल्या अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि कृषी महाविद्यालयांमुळे हे शहर आता उत्कृष्ट मानवी संसाधन पुरवणारे मोठे केंद्र बनले आहे. तसेच, मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांच्या तोडीचे अत्याधुनिक रुग्णालय आदिवासी भागात उभारून जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. शिरपूर येथे आयटी पार्कसाठी अँकर इन्व्हेस्टर शोधून त्याच्याशी आयटी पार्कबाबत चर्चा करण्यात येईल व आयटी पार्क उभारण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शिरपूर येथे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी ‘सुपर ५०’ योजना त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण करत आहे. खऱ्या अर्थाने आदिवासी कल्याणाची संकल्पना येथे प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. यासोबतच, जगातील प्रगत देशांना दर्जेदार कापड पुरवणारा वस्त्रोद्योग प्रकल्प आणि ‘शिरपूर पॅटर्न’च्या जलसंधारण कामांमुळे दुष्काळी भाग पाणीदार होण्यासोबत परिसराचा विकास झाल्याचा विशेष उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, धुळे जिल्ह्याचा आकांक्षीत जिल्ह्यांमधील समावेशानंतरच्या गेल्या दीड वर्षांत जिल्ह्यात तब्बल ४० हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक आली आहे. यात प्रामुख्याने रसायन व अन्नप्रक्रिया क्षेत्रात १ हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित झाली असून, केवळ सामंजस्य करार न करता हे उद्योग प्रत्यक्ष उभारले जातील. याशिवाय, दोंडाईचा येथील २५० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प हरित ऊर्जेच्या दृष्टीने एक मोठा टप्पा ठरणार आहे. महामार्गांचे जाळे, सिंचन व्यवस्था, मुंबई-दिल्ली औद्योगिक पट्टा आणि इंदूर-मनमाड रेल्वेमुळे या भागात एक मोठी व सक्षम औद्योगिक परिसंस्था तयार झाली आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

महसुली जमिनीच्या पट्ट्यांवर मिळणाऱ्या सर्व शासकीय योजना लवकरच वन जमिनीच्या पट्ट्यांवरही लागू केल्या जातील, अशी घोषणा करून यामुळे आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिरपूर आणि परिसराच्या सर्वांगीण विकासात आपण तालुक्याच्या पाठीशी एका ‘भावासारखे’ पूर्ण ताकदीने उभे राहू, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

पालकमंत्री श्री.रावल म्हणाले,शिरपूरमध्ये शिक्षण, सिंचन व उद्योग क्षेत्रात मोठे काम उभे राहिले आहे. देशात प्रथमच सुरू झालेली कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रशासकीय प्रणाली व नव्याने सुरू झालेले वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. तपनभाई पटेल यांच्या नावाने सुरू झालेले हे अद्ययावत रुग्णालय खान्देशातील लोकांसाठी मोठी आरोग्य सुविधा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी धुळ्याचा आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत समावेश केल्याने जिल्ह्याला न्याय मिळाला आहे. जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी नरडाणा-शिरपूर परिसरातील दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिकेला चालना देण्यासह शिरपूर व धुळे येथील विमानतळांचा विकास, मालवाहतूक केंद्र व सिंचनाच्या सुलवाडे-जामफळ, प्रकाशा-बुराई, अक्कलपाडा यांसारख्या अपूर्ण प्रकल्पांना पूर्ण क्षमतेने चालना देण्यासाठी विशेष निधीची आवश्यकता आहे. जिल्ह्याच्या प्रशासनातील रिक्त पदेही तातडीने भरावीत, अशी मागणी श्री. रावल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

राज्य शासनाने सर्वसामान्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्याचे ते म्हणाले. लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी सन्मान योजना व कृषी पंपांना मोफत वीज देण्याच्या निर्णयामुळे महिला व शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने यापूर्वीही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती व आताही हे शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

वस्त्रोद्योग मंत्री श्री.सावकारे म्हणाले, शिरपूर येथील हे नवे रुग्णालय केवळ शिरपूर किंवा धुळे जिल्ह्यासाठीच नव्हे, तर जळगाव, नंदुरबार व शेजारील मध्य प्रदेशातील रुग्णांसाठीही जीवनदान ठरेल. शिरपूर येथील शिक्षणाचा दर्जा उत्तम असून संस्थांमध्ये प्रवेशासाठी गुणवत्ता निकष काटेकोरपणे पाळले जातात. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या शहरांत जाण्याऐवजी येथेच शिक्षण घेण्यास प्राधान्य देतात. नगरपालिकेने राबवलेले उपक्रम व निर्माण केलेल्या रोजगाराच्या संधींमुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेनुसार राज्याची वाटचाल सुरू आहे. प्रत्येक शहराची व तालुक्याची क्षमता ओळखून तिथे विकासकामे केली जात आहेत, ज्यामुळेच गडचिरोलीसारखा जिल्हा आज देशाचे ‘पोलाद केंद्र’ म्हणून उदयास येत आहे. प्रशासकीय कामांचा सूक्ष्म पाठपुरावा करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत, असेही श्री.सावकारे यांनी सांगितले.

आमदार श्री.पटेल म्हणाले, शिरपूरमध्ये सर्वसामान्यांना अत्यंत कमी खर्चात आरोग्य सेवा देण्यासाठी १ हजार २०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयाचा फायदा धुळे, नंदुरबार, जळगाव व खंडवा परिसरातील गरिबांना होईल. परिसरातील शेती, शिक्षण, पर्यावरण, पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मिती क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला.  सुमारे पंधरा ते सतरा हजार तरुणांना वस्त्रोद्योग प्रकल्पामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला आहे, ज्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे जीवनमान सुधारले आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात आमदार श्री. पावरा म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे. पटेल कुटुंबामुळे शिरपूर तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे. शिरपूर तालुका आदिवासीबहुल आहे. या भागासाठी रस्ते करण्यासाठी वन विभागाच्या अटी शिथिल व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!
Exit mobile version