
(नंदुरबार) महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांच्या संकल्पनेतून राज्यातील 10 गावांची ‘मधाचे गाव’ म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील बोरझर (ता. नवापूर) या गावाची निवड करण्यात आली असून, 27 मार्च 2026 रोजी प्रशिक्षित 30 लाभार्थ्यांना मध संकलन साहित्याचे वाटप महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती गीतांजली बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश गवांदे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
रोजगार आणि पर्यटनाची सांगड
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती गीतांजली बाविस्कर आणि सह मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती बाविस्कर म्हणाल्या की, “मधाचे गाव या उपक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. केवळ मध उत्पादनच नव्हे, तर पर्यटन क्षेत्रातही यामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील”. श्री. ठाकरे यांनी बोरझरच्या वनसंपत्तीचे कौतुक करत हा उद्योग वाढवण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे नमूद केले.
प्रशिक्षण आणि साहित्य वाटप
बोरझर, उकळापाणी व प्रतापपूर येथील 30 मधपाळांची या योजनेसाठी निवड करण्यात आली होती. या लाभार्थ्यांचे प्राथमिक प्रशिक्षण 27 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पूर्ण झाले होते. या कार्यक्रमात या सर्वांना आधुनिक मध साहित्य प्रदान करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना योजनेमुळे मिळालेला अनुभव आणि प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले .
महिलांसाठी विशेष प्रयत्न
कार्यक्रमात पंचायत समिती सदस्या सौ. कातूताई गावीत यांनी महिला वर्गासाठी असलेल्या योजनांची माहिती देण्याची विनंती केली, तसेच कर्ज प्रकरणांसाठी बँकांच्या सहकार्याबाबत अपेक्षा व्यक्त केली. सरपंच सौ. रुंधा गावीत यांनी मधपाळांनी हे कौशल्य इतरांनाही शिकवावे, असे आवाहन केले.
सामूहिक सुविधा केंद्र आणि सेल्फी पॉईंट
यावेळी श्रीमती बाविस्कर व श्री. ठाकरे यांनी गावात उभारण्यात येणारे सामूहिक सुविधा केंद्र, ‘मधुबन’ आणि ‘सेल्फी पॉईंट’च्या जागेची पाहणी केली. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सविस्तर माहिती रुपेश पाटील यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश गंवादे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.