सैताणे गावाला जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची भेट; नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासकामांना गती देण्याचे निर्देश
0
District Collector Dr. Mittali Sethi visits Saitane village; issues directives to accelerate development works after understanding citizens' issues.
(नंदुरबार) जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज मौजे सैताणे, ता. जि. नंदुरबार येथे भेट देऊन गावातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या विविध समस्या व मागण्या जाणून घेतल्या.
यावेळी ग्रामस्थांनी कर्जमुक्ती, पिण्याच्या पाण्याची समस्या, गावातील रस्त्यांची दुरुस्ती, जलसिंचनासाठी तापी–बुराई प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करणे तसेच पाटबंधारे विभागामार्फत पाटचारी (कालवे) दुरुस्ती करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली. संबंधित विभागांनी या मागण्यांवर आवश्यक कार्यवाही करून विकासकामांना गती द्यावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी गावातील अंगणवाडी केंद्राला भेट देत चिमुकल्या बालकांशी संवाद साधला. अंगणवाडीतील सुविधा, बालकांना दिला जाणारा आहार, शिक्षण व इतर मूलभूत बाबींची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा गुणवत्तापूर्ण पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला.
याच दौऱ्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या विशेष सघन पुनरिक्षण (SIR) कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम अचूक, पारदर्शक व विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासन सातत्याने कार्यरत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी यावेळी सांगितले.