नंदुरबार नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्रकल्प लवकर सुरू करण्याच्या सूचना
District Collector inspects Nandurbar Municipality's solid waste management project, suggests early start of project under Swachh Maharashtra Mission
नंदुरबार नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास आज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. महाराष्ट्र शासनाच्या ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0’ अंतर्गत मागील वर्षी या प्रकल्पात नवीन शेड उभारणी तसेच आवश्यक यंत्रसामग्री लावण्यात येत आहे. सद्यस्थितीत प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती घेत आढावा घेतला.
पाहणीदरम्यान नगरपालिका अभियंता, स्वच्छता निरीक्षक तसेच जिल्हा तांत्रिक तज्ञ (घनकचरा व्यवस्थापन) यांनी प्रकल्पातील विविध यंत्रसामग्री, कचरा प्रक्रिया पद्धती आणि खतनिर्मिती प्रक्रियेबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी प्रकल्प तातडीने सुरू करून शहरातील घनकचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या प्रक्रियेतून तयार होणारे दर्जेदार सेंद्रिय खत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शहरातील कचऱ्याचे स्रोतस्तरावर विलगीकरण अधिक प्रभावीपणे राबविणे, तसेच रस्त्यांच्या कडेला साचणारे कचऱ्याचे ढिगारे नियमित उचलून स्वच्छता राखण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन स्वच्छता व्यवस्थेची पाहणी करत सुधारणा करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक नंदुरबार घडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे शहरातील स्वच्छतेसह पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळणार आहे.