(नंदुरबार) मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कन्व्हर्जन समितीची बैठक दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
बैठकीची सुरुवात दोन्ही प्रकल्प कार्यालयांकडून जिल्ह्यातील सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समित्या (CFRMC) आणि सामुहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन आराखडे (CFRMP) यांच्या आढाव्याने झाली. यावेळी तळोदा प्रकल्प कार्यालयाकडून मंजूर झालेल्या २०१ आराखड्यांना वनविभागाच्या वर्किंग प्लानमध्ये समाविष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिवंत वनपट्टा मोहीमेचा आढावा:
बैठकीत मागील २ ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्रामसभांमधील ‘जिवंत वनपट्टा मोहीम’ (वैयक्तिक मृत वनहक्क धारकांच्या वारसांना वारस दाखले मोहीम) याबाबत सविस्तर चर्चा झाली. प्रकल्प कार्यालयांना पुढील महिन्यात ग्रामसभा आयोजित करून सामुहिक वनहक्क समित्यांचे पुनर्गठन, आराखड्यांचे वाचन, तसेच वनहक्क कायद्यावरील शासन निर्णय आणि वैयक्तिक वनहक्क पुरावा याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
CFR कामकाज आणि पुढील नियोजन:
बैठकीदरम्यान टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS), मुंबई यांच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील CFR कामकाजाचा आढावा सादर केला.
यामध्ये पुढील महिन्यापर्यंत तळोदा प्रकल्पातील ५ गावे आणि नंदुरबार प्रकल्पातील ५ गावे, अशा एकूण १० गावांमध्ये कामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
मा. जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, ‘CFR प्राप्त गावांमध्ये उत्कृष्ट कार्य झाले असून, अशा गावांच्या यशोगाथा व बेस्ट प्रॅक्टिसेसचे दस्तऐवजीकरण होणे आवश्यक आहे. तसेच वनहक्क कायद्याचे बारकावे लोकांपर्यंत पोहोचावेत, यासाठी स्थानिक भाषेत माहितीपर यूट्यूब व्हिडिओ तयार करावेत.’
वनहक्क प्रमाणपत्र दुरुस्ती व पुढील सूचना:
बैठकीत जिल्ह्यातील वनहक्क प्रमाणपत्रांमधील त्रुटी — जसे की कक्ष क्रमांक, नावे किंवा गावाचे नाव चुकीचे असल्यास — अशा तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी वनहक्क कक्षाने कार्यवाही करावी अशा सूचना देण्यात आल्या.
यावर्षी वनविभागाने CFR क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामे सुरू करावीत, असेही स्पष्ट निर्देश देण्यात आले. जर या वर्षी CFR मध्ये प्रत्यक्ष कामे सुरू झाली नाहीत, तर दोन्ही वनविभागांना प्लांटेशन निधी थांबविण्यात येईल, असा कडक इशारा देण्यात आला.
‘वनसंपदा’ पोर्टलवरील नवीन उपक्रम:
अलीकडेच सुरू केलेल्या ‘वनसंपदा’ पोर्टलवर CFR संबंधित माहिती नोंदविण्यासाठी CFRMC चे लॉगिन तयार करून प्रशिक्षण आयोजित करण्याच्या सूचना मा. प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी श्री. अनय नावंदर यांनी दिल्या.
ठळक मुद्दे:
#Nandurbar#वनहक्कअभियान#CFRMC#CFRMP#ForestRightsAct#VanhaqMission#NandurbarDistrict#TISS#VanSampada#DistrictConversionCommittee#MitaliSethi
