
नंदुरबार जिल्ह्यात पोषणसंवेदनशील शेती, सहभागी भूजल व्यवस्थापन (Participatory Groundwater Management) आणि पर्यायी उपजीविका या विषयांवर जिल्हास्तरीय सह-रचना कार्यशाळा (Co-Design Workshop) आज यशस्वीपणे पार पडली. ही कार्यशाळा Britannia Nutrition Foundation यांच्या पुढाकाराने MSSRF (एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन) व ACWADAM, पुणे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळा मा.जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कार्यशाळेत विविध संस्थांकडून सादरीकरणे करण्यात आली-
ACWADAM, पुणे यांनी अक्कलकुवा व अक्राणी (धडगाव) तालुक्यातील निवडक गावांमध्ये राबविण्यात येत असलेल्या सहभागी भूजल व्यवस्थापन प्रकल्पाची माहिती दिली. या प्रकल्पामध्ये गावपातळीवर प्रशिक्षण देणे, भूजलाचा शास्त्रीय अभ्यास करणे, गावासाठी पाणी व्यवस्थापनाचे नियोजन तयार करणे आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग वाढवणे यावर भर देण्यात येत आहे. यासोबतच योग्य निर्णय घेण्यासाठी निर्णय सहाय्य प्रणाली (Decision Support System) विकसित केली जात आहे. ग्रामपंचायतींसोबत बैठका घेणे, गावांची निवड करणे आणि प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन पाहणी करणे अशा पद्धतीने काम सुरू आहे. या प्रक्रियेतून गावातीलच काही व्यक्तींना Community Resource Person (CRP) म्हणून तयार केले जात असून, त्याद्वारे सामाजिक गरजा आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन ग्रामस्तरीय जलनियोजन केले जात आहे.
MSSRF तर्फे शाश्वत ग्रामविकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येईल, यावर भर देण्यात आला. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांमध्ये आढळणारे पोषणअभाव, अॅनिमिया आणि कुपोषण यांसारखे प्रश्न मांडण्यात आले. शेतीच्या माध्यमातून पोषण कसे सुधारता येईल आणि पोषणपूरक शेती पद्धती कशा राबवता येतील, यावर सविस्तर व सोप्या पद्धतीने चर्चा करण्यात आली.
डॉ. हेडगेवार सेवा समिती कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी हवामान बदलाला तोंड देणाऱ्या आणि पोषणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या शेती तंत्रज्ञानाची माहिती दिली. यामध्ये मॉडेल फार्मची उभारणी, NICRA अंतर्गत शेतातील प्रात्यक्षिके, माती व पाणी साठवण्यासाठी शेतबांध, कमी खर्चाचे तात्पुरते बंधारे (TCD), कमी दाबावर चालणारी रेन पाईप सिंचन पद्धत यांचा समावेश होता.
तसेच सुपोषण वाटिका निर्माण करून घरगुती पातळीवर पोषण वाढवणे, रंगीबेरंगी भाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व, जनावरांसाठी चारा उपलब्धता, स्थानानुसार शेती यांत्रिकीकरण, जिल्ह्यातील जैवविविधतेचे संवर्धन, भरडधान्यांचे वाढते महत्त्व आणि महिलांसाठी तंत्रज्ञान पार्क याबाबतही सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले.
मा.जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आपल्या मार्गदर्शनात मिशन जलबंधू, प्रकल्प दिशा, निवासी कौशल्य केंद्र यांसारख्या सुरू असलेल्या उपक्रमांशी समन्वय साधण्याची गरज अधोरेखित केली. “गावांना पाणी, उत्पन्नवाढ, उत्तम आरोग्य व पोषण आणि मुलांसाठी उज्ज्वल करिअरच्या संधी निर्माण करणे हेच आपले ध्येय आहे,” असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी सरपंच, ग्रामसेवक व विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी जिल्ह्यात मोठी संधी असल्याचे सांगत महिला बचत गटांमार्फत पोषणाधारित उत्पादने, प्रभावी मार्केटिंग, ब्रँडिंग व पॅकेजिंग यावर भर दिला. कृषी विविधतेमुळे हवामान सहिष्णुता वाढत असून वनउत्पादन प्रक्रिया, कोल्ड स्टोरेज, रोपवाटिका, सूक्ष्म सिंचन आदी क्षेत्रात काम करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
कार्यशाळेला मा.शिवांश सिंह (IAS), नवापूर, तळोदा व अक्कलकुवा येथील गटविकास अधिकारी, कृषी, जलसंधारण, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी, विविध गावांचे सरपंच व तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही कार्यशाळा नंदुरबार जिल्ह्यात पोषण, पाणी व्यवस्थापन व शाश्वत उपजीविकांसाठी एकत्रित आणि लोकसहभागातून काम करण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.