
मुख्य राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे व नागपूर खंडपीठ राज्य माहिती आयुक्त गजानन निमदेव, मेट्रोचे संचालक अनिलकुमार कोकाटे यांनी आज या प्रदर्शनास भेट दिली.
महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून राज्यातील जनतेपर्यंत माहिती पोहचविण्याचे महत्त्वपूर्ण काम लोकराज्यने केले आहे. शासनाने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय हे कायद्याच्या स्वरुपात प्रशासनातून सर्वसामान्य जनतेला प्रत्ययास येतात. माहिती प्रसारासमवेत प्रशासनाप्रती विश्वासार्हता निर्माण करण्याचे कार्य लोकराज्य या मासिकाने केले आहे. गत पाच दशकांपेक्षा अधिक कालावधीपासून जपून ठेवलेले हे अंक कायदेविषयक साक्षरतेच्या दृष्टीनेही तेवढेच महत्त्वाचे आहेत. प्रत्येक दशकात प्रशासकीय पातळीवर झालेल्या बदलांचे टप्पे दाखविणारे दस्तऐवज म्हणून आपण याकडे पाहिले पाहिजे, असे मुख्य राज्य माहिती आयुक्त पांडे यांनी यावेळी सांगितले.
या प्रदर्शनात १९६४ पासूनचे दुर्मिळ लोकराज्य विशेषांक पाहण्यास उपलब्ध आहेत.