Home पर्यटन दिवाळवाडी धरण ठरत आहे पावसाळी पर्यटनाचे आकर्षण; विकासासाठी सकारात्मक अपेक्षा

दिवाळवाडी धरण ठरत आहे पावसाळी पर्यटनाचे आकर्षण; विकासासाठी सकारात्मक अपेक्षा

1
Diwalwadi Dam emerging as a monsoon tourism attraction; positive expectations for development.

पाचल(प्रतिनिधी):-सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दिवाळवाडी पाझर तलाव (धरण) पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होत आहे. धरणावरून वाहणारे पाणी, हिरवाईने नटलेला परिसर आणि रमणीय वातावरणामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटकांची पावले या ठिकाणी वळत आहेत.
पर्यटनाच्या दृष्टीने मोठी क्षमता असलेल्या या ठिकाणी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. याशिवाय रेलिंग, संरक्षण कठडे, इशारा फलक, प्रकाश व्यवस्था, वाहनतळ आणि इतर मूलभूत सुविधा उभारण्यात आल्यास दिवाळवाडी धरण अधिक सुरक्षित आणि आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. या पर्यटनस्थळाचा विकास झाल्यास स्थानिक युवक, शेतकरी, महिला बचत गट आणि लघुउद्योजकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतील. तसेच भविष्यात आवश्यक परवानग्यांनुसार नौकाविहार (बोटिंग) यांसारखे पर्यटन उपक्रमही सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, दिवाळवाडी धरण पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावे, यासाठी ग्रामपंचायत पाचलने ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर करून संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. या अनुषंगाने आवश्यक पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. मात्र, सन 2025 पासून हा प्रस्ताव संबंधित विभागाकडे प्रलंबित असून, त्यावर लवकर सकारात्मक निर्णय झाल्यास या परिसराच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
कोकणाच्या निसर्गसौंदर्यात भर घालणारे दिवाळवाडी धरण आगामी काळात एक महत्त्वाचे पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून उदयास येऊ शकते, असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.