Home नंदुरबार जिल्हा नवी दिल्लीत 7-8 मार्च रोजी पहिले महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन

नवी दिल्लीत 7-8 मार्च रोजी पहिले महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन

First Women Government Officials Marathi Literature Conference to be held in New Delhi on March 7-8

नवी दिल्ली- प्रशासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि स्वराज्यरक्षक महाराणी तारा राणी यांच्या शौर्याचा वारसा जतन करण्यासाठी ‘सरहद, पुणे’ आणि ‘महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली’ यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी ७ आणि ८ मार्च २०२६ रोजी नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे पहिले ‘अखिल भारतीय मराठी महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे.

आज नवी दिल्लीत आयोजित विशेष पत्रकार परिषदेत संमेलनाच्या निमंत्रक तथा महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर. विमला यांनी या संमेलनाची अधिकृत घोषणा केली. पत्रकार परिषदेला महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे आणि ‘सरहद’चे सह-संयोजक लेशपाल जवळगे उपस्थित होते.

या संमेलनाचे आयोजन महाराणी तारा राणी यांच्या 351 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून करण्यात आले आहे. प्रशासनात कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यांमधील सुप्त साहित्यिक गुणांना व्यासपीठ ओळख मिळवून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, माजी लेफ्टनंट जनरल मा. माधुरी कानिटकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

हे संमेलन अत्यंत भव्य स्वरूपात नियोजित असून, एकाच वेळी तीन समांतर सभागृहांमध्ये विविध उपक्रम रंगणार आहेत:सभागृह 1: सामाजिक व साहित्यिक परिसंवाद, चर्चासत्रे आणि मान्यवरांच्या मुलाखती.

सभागृह 2: निमंत्रित कवींचे भव्य काव्य संमेलन. सभागृह 3: पुस्तक प्रकाशन, गझल सादरीकरण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

नोंदणी आवाहन

देशभरातील विविध राज्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत असलेल्या मराठी महिला शासकीय अधिकाऱ्यांनी या संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

नोंदणीसाठी संपर्क: संकेतस्थळ: sahityasammelan.sarhad.in

संपर्क: लेशपाल जवळगे (सह-संयोजक, सरहद) – ८४८४०५५२५२

प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतानाच साहित्याची जोपासना करणाऱ्या महिलांसाठी हे संमेलन एक मैलाचा दगड ठरणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version