(नंदुरबार) राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत आज जिल्हा महिला रुग्णालय, नंदुरबार येथील District Early Intervention Centre (DEIC) येथे ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांसाठी मोफत कान-नाक-घसा (ENT) तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे तसेच भगवती ENT एंडोस्कोपी सेंटर, नंदुरबार येथील ENT तज्ज्ञ डॉ. राजेश कोळी यांच्या संयुक्त हस्ते करण्यात आले. हे शिबिर राज्यस्तरीय सामंजस्य करारांतर्गत भगवती ENT एंडोस्कोपी सेंटर व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) / DEIC यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले. शिबिरामध्ये एकूण २९ बालकांची सखोल ENT तपासणी करण्यात आली.
यामध्ये:
1. कानाचे संसर्ग व ऐकण्यास अडथळे
2. नाकातील व घशाचे विकार
3. एंडोस्कोपीद्वारे आवश्यक तपासण्या
4. कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या बालकांचा पुढील पाठपुरावा
याबाबत तपासणी, उपचार व सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्ह्यातील विविध भागांतून RBSK पथकांमार्फत संदर्भित केलेल्या बालकांसह पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. तपासणीदरम्यान आढळलेल्या आजारांबाबत पालकांना योग्य उपचार सल्ला देण्यात आला तसेच आवश्यक त्या ठिकाणी पुढील उपचारांसाठी संदर्भ देण्यात आले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांनी सांगितले की, ENT आजार लवकर ओळखून त्यावर वेळेत उपचार केल्यास बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. ज्या बालकांना कानाचे यंत्र (Hearing Aid) आवश्यक आहे, त्यांना ते जिल्हा रुग्णालय व RBSK अंतर्गत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी RBSK पथकातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक (समन्वयक) श्री. मनोहर ढिवरे, DEIC व्यवस्थापक डॉ. एंजल वसावे, डॉ. कपिल दुसेजा, तसेच DEIC कर्मचारी भैया अहिरे, महेश नगराळे, प्रीतेश खैरनार, शुश्मा बिरारे, भागेश्री पगारे, अस्मिता वसावे यांनी विशेष परिश्रम घेतले. भगवती ENT एंडोस्कोपी सेंटर व ध्वनी फाउंडेशन यांचेही सहकार्य लाभले.
हा उपक्रम बालकांच्या आरोग्य संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरून, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांच्या उज्ज्वल आरोग्यासाठीचा एक प्रभावी प्रयत्न ठरला आहे.
