
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि वनसंपदा वाढवण्यासाठी शासन स्तरावर कोट्यवधी रुपये खर्च करून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, दुसरीकडे दुर्गम भागात याच मोहिमेला हरताळ फासला जात असल्याचे चित्र समोर आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात या भागातील संबंधित वनपाल (फॉरेस्टर) आणि वनकर्मचारी कर्तव्यावर असतानाही जंगलात नियमित फेरफटका मारत नसल्यामुळे बेकायदेशीर कृत्ये वाढली आहेत, असा थेट आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केला आहे. वन विभागाची कोणतीही गस्त किंवा वचक नसल्यामुळेच अशा पद्धतीची बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांचे आणि लाकूड तस्करांचे धाडस दिवसागणिक वाढत आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील मौजे कुवा येथील अंधारबारी पाडा शिवारात अत्यंत मौल्यवान अशा सागवान सदृश वृक्षांची बेकायदेशीर रित्या कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील अंधारबारी पाडा परिसरातील जंगलात काही अज्ञात इसमांकडून तसेच ओहवा (गोरजाबारी पाडा) येथील रहिवासी रामजा कोयद्या वसावे या इसमाने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता जंगलात घुसून अत्यंत मोठ्या प्रमाणावर मौल्यवान झाडांची कत्तल केली आहे. निसर्गाचा हा ऱ्हास डोळ्यांदेखत होत असल्याने संतप्त गावकऱ्यांनी थेट खापर येथील वनक्षेत्रपाल (RFO) कार्यालयात धाव घेऊन लेखी तक्रार दाखल केली आहे.
एकीकडे शासन दरवर्षी कोट्यवधी झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवून शासकीय यंत्रणेला कामाला लावते, तर दुसरीकडे आधीच अस्तित्वात असलेल्या जंगलातील मौल्यवान वृक्षांची राजरोसपणे कत्तल होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होईपर्यंत स्थानिक वनपाल काय करत होते आणि वन विभागाच्या अशा ढिसाळ कारभारामुळेच लाकूड तस्करांचे धाडस वाढत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या भागात वनपाल फेरफटका मारत नसल्यामुळे अशा पद्धतीचे बेकायदेशीर कृत्य होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. निसर्गाची ही हानी थांबवण्यासाठी सजग नागरिकांनी एकत्र येत धोना रामा वसावे, दिला चमाऱ्या वसावे, जोला गुजऱ्या वसावे, राम्या रामा वसावे यांच्यासह अनेक गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन वनक्षेत्रपाल वन विभाग खापर यांना सादर केले आहे. आमच्या भागात निसर्गाचे संतुलन बिघडवणारी ही वृक्षतोड अत्यंत गंभीर असून वनविभागाने तात्काळ या जागेवर जाऊन पंचनामा करावा आणि संबंधित दोषींवर कडक कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जर वन विभागाने सुस्त वनपालाकडून स्पष्टीकरण मागवून यावर त्वरित ठोस ॲक्शन घेतली नाही, तर गावकरी तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबतील, असा इशाराही स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. दुर्गम भागात होणाऱ्या या छुप्या वृक्षतोडीमुळे मौल्यवान वनसंपदा धोक्यात आली असून, आता या लेखी तक्रारीनंतर खापर वनविभाग झोपेतून जागे होऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करणार का आणि दोषींवर कठोर वनगुन्हे दाखल करून आपली प्रतिमा सुधारणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.