शासनाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
1
Guidance from the District Collector for the effective implementation of government schemes.
(नंदुरबार) मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींची आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीस नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त श्री. जमीर लेंगरेकर, नंदुरबार नगराध्यक्षा श्रीमती रत्ना रघुवंशी, नवापूर नगराध्यक्ष श्री. जयवंत जाधव, शहादा नगराध्यक्ष श्री. अभिजीत पाटील, तळोदा नगराध्यक्षा श्रीमती भाग्यश्री चौधरी तसेच सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, सभापती व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी श्री. जमीर लेंगरेकर यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते सर्व नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.
बैठकीत स्वच्छ भारत अभियान (SBM), माझी वसुंधरा अभियान, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६, भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी आणि शासनाच्या सूचनांवर चर्चा करण्यात आली.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सदस्यांनी मांडलेल्या प्रशासकीय अडचणींवर जिल्हा प्रशासनाने तात्काळ मार्गदर्शन केले. मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नगरपालिकांच्या विकासकामांसाठी आवश्यक जागांबाबत त्वरित निर्णय घेण्याचे तसेच स्थानिक पातळीवरील अडचणी प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले.
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांचा सहभाग वाढविणे आणि विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमात लोकप्रतिनिधींनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा सर्वांगीण विकास आणि शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.