निती आयोगाच्या Aspirational Districts Programme अंतर्गत मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे व उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यात कार्यान्वित झालेल्या ब्रेन हेल्थ क्लिनिकमार्फत रनाळे येथे आशा सेविकांसाठी मेंदू आरोग्याविषयक मार्गदर्शन व परिचय (IEC & Orientation) सत्र दि. २२ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आले. हे सत्र रनाळे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय पवार यांच्या सहकार्याने पार पडले.
या सत्रात रनाळे परिसरातील १८ आशा सेविका व १ समुपदेशक, असे एकूण १९ सहभागी उपस्थित होते. कार्यक्रमात नंदुरबार ब्रेन हेल्थ क्लिनिकचे जिल्हा समन्वयक श्री. ओजस भावसार, वैद्यकीय अधिकारी डॉ. रिझवान अन्सारी, फिजिओथेरपिस्ट डॉ. कल्याणी माळी आणि मानसोपचार समुपदेशक पूजा शर्मा यांनी ब्रेन हेल्थ क्लिनिकची सविस्तर माहिती दिली.
यावेळी पक्षाघात (स्ट्रोक), अपस्मार (मिर्गी), मानसिक आरोग्य समस्या तसेच मेंदू व मज्जासंस्थेशी संबंधित आजारांची प्राथमिक लक्षणे, धोक्याची चिन्हे, लवकर निदानाचे महत्त्व आणि योग्य वेळी रुग्णालयात संदर्भ देण्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण व समुदाय स्तरावर रुग्ण ओळखण्यात आशा सेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय पवार यांनी समुदाय पातळीवर लवकर निदान व उपचारासाठी आशा सेविकांचे योगदान निर्णायक ठरते, असे नमूद केले. या सत्रास समुपदेशक निखिल पाटील तसेच रनाळे ग्रामीण रुग्णालयातील परिचारक व कर्मचारीवृंद उपस्थित होते.
या मार्गदर्शन सत्रामुळे आशा सेविकांना मेंदू आरोग्यविषयक आजार ओळखण्याबाबत अधिक सक्षम माहिती मिळून, भविष्यात ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास निश्चितच मदत होणार आहे.
