नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य सेवेला नवी उभारी; अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे लोकार्पण
0
Healthcare services in Nandurbar district get a new boost; state-of-the-art Neonatal Intensive Care Unit and Mother's Milk Bank inaugurated.
नंदुरबार जिल्ह्यातील नवजात बालक व मातांसाठी आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण भर पडली असून, राज्याचे मा.वैद्यकीय शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयातील महिला व बाल रुग्णालयामध्ये अत्याधुनिक स्पेशल नवजात अर्भक काळजी विभाग (SNCU) आणि मातृदूध बँकेचे लोकार्पण करण्यात आले.
जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक सुविधांमुळे अकाली जन्मलेली, कमी वजनाची तसेच गंभीर आजारी नवजात बालकांना तज्ज्ञ उपचार मिळणार आहेत. ३९ खाटांच्या सुसज्ज नवजात अर्भक काळजी विभागामुळे नवजात शिशूंना अधिक सुरक्षित व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.
मातृदूध बँकेच्या माध्यमातून गरजू नवजात बालकांना सुरक्षित, तपासणी केलेले आणि पोषणमूल्यांनी समृद्ध मातृदूध उपलब्ध करून दिले जाणार असून, बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
उद्घाटनानंतर मा.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जिल्हास्तरीय आरोग्य आढावा बैठकीत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात आला. तसेच रिक्त नर्सिंग पदे भरणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींची दुरुस्ती, एमआरआय केंद्राची स्थापना आणि आरोग्य संस्थांसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
यावेळी ग्रामीण रुग्णालय धडगाव, उपजिल्हा रुग्णालय तळोदा व नवापूर येथील नवजात शिशु स्थिरीकरण कक्ष तसेच ग्रामीण रुग्णालय शहादा येथील शस्त्रक्रिया विभागाचे ऑनलाइन उद्घाटनही करण्यात आले.
“नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे,” असे आवाहन मा.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी केले.