नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य जनजागृती व समाजसेवेच्या दृष्टीने आज दोन महत्त्वपूर्ण उपक्रम पार पडले. महिला रुग्णालय, नंदुरबार येथे एचआयव्ही-एड्स विषयावर संवेदनिकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, तर अक्कलकुवा येथे वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले.
महिला रुग्णालयात एचआयव्ही-एड्स विषयावर कार्यशाळा:
महिला रुग्णालय, नंदुरबार येथे एचआयव्ही-एड्स विषयावर जनजागृती व संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. नितीन पाडवी, डॉ. बडगुजर, गावीत सिस्टर, तसेच रुग्णालयातील सर्व कर्मचारी व सफाई कर्मचारी उपस्थित होते. सुभाष निकम (समुपदेशक) आणि किरण देवरे (प्रशांत, आय.सी.टी.सी.-१, जिल्हा रुग्णालय, नंदुरबार) यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी एचआयव्ही-एड्सविषयी जनजागृती, प्रतिबंधक उपाययोजना, तसेच समाजात याबाबत संवेदनशीलता निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
रक्तदानातून समाजसेवेचा संदेश – अक्कलकुवा महाविद्यालयाचा उपक्रम:
याच दिवशी अक्कलकुवा येथील आर. एफ. एन. एस. वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामीण रुग्णालय आय.सी.टी.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन प्राचार्य प्रा. डॉ. सी. पी. सावंत यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे, फिजिशियन डॉ. नरेश पाडवी, शल्यचिकित्सक डॉ. राजेश वसावे, डॉ. भरत पाटील, डॉ. विजय पाटील, डॉ. क्षमा रतेरिया, समुपदेशक महेश कुवर, वैज्ञानिक अधिकारी जय सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी राजेश्वरसिंग पाडवी, सहाय्यक अंकुश खोब्रागडे, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या शिबिरात २१ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला. याशिवाय, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे शुगर, बी.पी. आणि हिमोग्लोबिन तपासणी मोफत करण्यात आली. या उपक्रमामुळे समाजात आरोग्य जनजागृती व रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित झाले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे, डॉ. नरेश पाडवी आणि डॉ. राजेश वसावे यांनी शिबिराला भेट देऊन आयोजक व रक्तदात्यांचे आभार मानले. हे दोन्ही उपक्रम नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य जनजागृती, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि समाजसेवेच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
