
तळोदा तालुक्यातील कढेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थी संघ व ग्रुप ग्रामपंचायत कढेल यांच्या संयुक्त विद्यमाने नव्याने उभारण्यात आलेल्या संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर गटविकास अधिकारी राजू किरवे यांच्या हस्ते तर सहाय्यक गटविकास अधिकारी काशिनाथ पवार, गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर, केंद्रप्रमुख युवराज मराठे यांच्या उपस्थित संपन्न झाले.मकर संक्रांतीनिमित्त गुणवत्तेचा पतंगोत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पतंगांवर चांगल्या सवयी, मूल्यशिक्षण व सामाजिक जाणीव यावर आधारित विविध घोषवाक्ये लिहिण्यात आली. “स्वच्छता ठेवा – आरोग्य जपा”, “वेळेचे महत्त्व ओळखा”, “आई-वडिलांचा आदर करा”, “नियमित वाचन करा”, “पर्यावरणाचे संरक्षण करूया”, “व्यसनांना नाही म्हणा” अशा घोषवाक्यांमुळे संपूर्ण परिसरात जनजागृती संदेश दिला.
या पतंगोत्सवातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, शिस्त, सकारात्मक सवयी व गुणवत्तेची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्लास्टिकमुक्त व पर्यावरणपूरक पतंगांचा वापर करून पर्यावरण संवर्धनाचाही संदेश देण्यात आला.
मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर यांनी, “शैक्षणिक प्रगतीसोबतच विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी व मूल्यांची जोपासना होणे आवश्यक आहे.” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी विद्यार्थी संघ, ग्रुप ग्रामपंचायत कढेल, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.