Home महाराष्ट्र नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात सातारा जिल्ह्याच्या स्वयंसहायता गटाच्या दालनाचे उद्घाटन

नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात सातारा जिल्ह्याच्या स्वयंसहायता गटाच्या दालनाचे उद्घाटन

Inauguration of the Satara district self-help group hall at Maharashtra Sadan in New Delhi

निवासी आयुक्त आर. विमला यांच्या संकल्पनेतून ग्रामीण उद्योजकांना राष्ट्रीय व्यासपीठ

नवी दिल्ली: महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे सातारा जिल्ह्यातील स्वयंसहायता गटांच्या (SHG) उत्पादनांसाठी कायमस्वरूपी दालनाचे उद्घाटन आज निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी अपर निवासी आयुक्त निवा जैन व सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार उपस्थित होत्या.

यंदा 15 ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील लखपती दीदी, बचत गटाच्या प्रमुख आणि आत्मनिर्भर क्लस्टर लेव्हल फेडरेशन (CLF) पुरस्कार विजेत्या दीदी यांच्यासह 20 महिलांनी सहभाग घेतला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी महाराष्ट्र सदनात श्रीमती विमला यांची भेट घेऊन आपली हस्तकला, खाद्यपदार्थ आणि स्थानिक उत्पादने भेट म्हणून सादर केली होती. या भेटीत सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशिनी नागराजन यांनी तयार केलेले निवेदन प्रतिनिधींमार्फत सुपूर्द केले होते, ज्यात बाजारपेठ आणि प्रदर्शनांमध्ये सहभागाची संधी तसेच आवश्यक समर्थनाची विनंती करण्यात आली होती. श्रीमती विमला यांनी या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत, या महिलांना त्यांची उत्पादने राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्याच आश्वासनाला प्रत्यक्ष रूप देत आज या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.

सातारा जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि आर्थिक वारशाला राष्ट्रीय व्यासपीठावर नेण्याच्या उद्देशाने श्रीमती विमला यांच्या संकल्पनेतून आणि अथक प्रयत्नांमुळे हे दालन अल्पावधीत साकार झाले आहे. दिल्लीच्या विशाल बाजारपेठेत स्वयंसहायता गटांच्या उत्पादनांना असलेली मागणी लक्षात घेता, हे दालन सातारा जिल्ह्यातील ग्रामीण उद्योजकांना त्यांची कला, कौशल्य आणि उत्पादने सादर करण्यासाठी कायमस्वरूपी व्यासपीठ प्रदान करेल.

सातारा जिल्ह्यातील स्वयंसहायता गटांनी शेती, अन्नपदार्थ आणि हस्तकला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. इंद्रायणी तांदूळ, सेलम-हळद, सेंद्रिय ज्वारी, बाजरी, स्ट्रॉबेरी, जागरी, शेंगदाणा तेल, घोंगडी, रेशीम वस्त्रे, साबण, मसाले आणि बाजरीचे कुकीज यांसारख्या उत्पादनांनी स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेत विशेष ओळख निर्माण केली आहे. विशेषतः साताऱ्याच्या घोंगडी आणि रेशीम वस्त्रांनी त्यांच्या टिकाऊपणा आणि सांस्कृतिक मूल्यांमुळे दिल्लीच्या ग्राहकांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे.

उद्घाटन प्रसंगी बोलताना श्रीमती विमला म्हणाल्या, “ सातारा जिल्ह्यातील लखपती दीदी आणि स्वयंसहायता गटांच्या महिलांनी भेटीदरम्यान दाखवलेल्या उत्साह आणि त्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्तेमुळे हे दालन साकारण्याची प्रेरणा मिळाली. हे दालन सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण उद्योजकांना त्यांची कला आणि कौशल्य राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्याची संधी देईल. दिल्लीतील मराठी बांधव आणि अन्य ग्राहकांनी या दालनाला भेट देऊन या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे.” त्यांनी पुढे सांगितले की, हे दालन केवळ विक्री केंद्र नसून, सातारा जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि आर्थिक वारशाला राष्ट्रीय व्यासपीठावर नेण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.

या उपक्रमाला ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान दालनासाठी प्रस्तावित जागेची पाहणी करून तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले होते. “सातारा जिल्ह्यातील स्वयंसहायता गटांनी स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. या दालनामुळे त्यांना दिल्लीच्या बाजारपेठेत कायमस्वरूपी स्थान मिळेल,” असे गोरे यांनी नमूद केले. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशिनी नागराजन यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत सांगितले की, “या दालनामुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळेल आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य ओळख मिळेल.”

दालनात सातारा जिल्ह्याची खास उत्पादने, भौगोलिक मानांकन (GI) प्राप्त वस्तू, शेती उत्पादने, हस्तकला आणि गृहउपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. भविष्यात फिरते दालन आणि बहुमजली मॉल यांसारख्या सुविधा उपलब्ध करून ग्रामीण उद्योजकता आणि महिला सक्षमीकरणाला आणखी चालना देण्याचे नियोजन आहे. हे दालन महाराष्ट्र सदनाला सातारा जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि आर्थिक केंद्राचे स्वरूप देईल, तसेच ग्रामीण उद्योजकांचा आत्मविश्वास वाढवून त्यांच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा देईल.

000000000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्त विशेष – 191

एक्स वर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi /https://x.com/MahaMicHindi

error: Content is protected !!
Exit mobile version