सांगली: राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, नुकसान भरपाईसाठी 41 हजार कोटींची तातडीची मदत जाहीर केली आहे. या व्यतिरिक्त शासनाकडून अजूनही उपाययोजना सुरू आहेत. भविष्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी यांत्रिक बोटी उपयुक्त ठरतील, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केला.

जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन 2024-25 अंतर्गत गतिमान प्रशासन तथा आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण अंतर्गत पलूस तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींना यांत्रिक बोटींच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. पलूस तालुक्यातील औदुंबर येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी चोपडेवाडी, संतगांव (राडेवाडी), बुर्ली, दह्यारी, तुपारी, नागठाणे, सुखवाडी व अंकलखोप या गावांसाठी प्राप्त फायबर ग्लास यांत्रिक बोटींचे लोकार्पण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपजिल्हाधिकारी तेजस्विनी नरवाडे, उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, गटविकास अधिकारी राजेश कदम, महेंद्र लाड, सम्राट महाडिक, राजाराम गरूड विविध गावचे सरपंच आदि उपस्थित होते.