मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने असुदे फाऊंडेशनसोबत सामंजस्य करार केला. या कराराअंतर्गत ‘industryconnect.app’ या तंत्रज्ञान आधारित प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनुभवाधारित करिअर मार्गदर्शन उपक्रम ठाणे अपर आयुक्त कार्यालय अंतर्गत येणाऱ्या १११ शासकीय आश्रमशाळांमध्ये राबवण्यात येणार आहे. हा उपक्रम पुढील तीन वर्षे चालणार असून, इयत्ता नववी ते बारावीतील सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचे अपर आयुक्त गोपीचंद कदम यांनी सांगितले.
आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि आयुक्त लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामंजस्य करार केला असून यावेळी असुदे फाऊंडेशनचे व्यंकटेश खारगे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी लोणारी, यूएनडीपीच्या अमृता भालेराव, तसेच असुदे फाऊंडेशनचे अनमोल सब्बानी, स्नेहल यादव, सिद्धांत जगताप, अपर्णा शाम उपस्थित होते.
करिअर मार्गदर्शन उपक्रमाची सुरुवात ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे या चार जिल्ह्यांतील आश्रमशाळांमधून होणार आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी जोडण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थी केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर त्यांना प्रत्यक्ष उद्योगभेटी, मेंटर्सशी संवाद आणि वास्तवाधारित शिक्षणाची संधी मिळेल. या प्लॅटफॉर्मद्वारे शाळा स्थानिक उद्योग क्षेत्राशी जोडल्या जाणार असून, विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध पर्यायांबाबत तसेच उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव, उच्च शिक्षणाच्या संधी आणि रोजगार तयारीसाठी मार्गदर्शन मिळेल अशी माहिती यावेळी देण्यात आली.
