Home महाराष्ट्र सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगीक कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक व्हावीत : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह...

सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगीक कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक व्हावीत : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

Simhastha Kumbh Mela related works should be done with quality and standard: Public Works Minister Shivendrasinh Bhosale

नाशिक:  नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा देशपातळीवरील महत्वाचे पर्व आहे. देश-विदेशातील भाविक येथे मोठ्या संख्येने भेट देणार आहेत. प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची महती अधोरेखित होणाच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक होतील यावर अधिक भर द्यावा, असे  प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी केले.

सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालयात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभाग संभाजीनगर चे अधीक्षक अभियंता विवेक माळुंजे, सार्वजनिक बांधकाम विभाग धुळेचे अधीक्षक अभियंता अनील पवार, राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणेचे अधीक्षक अभियंता दयानंद विभुते, सा. बा. विभाग नाशिक  कार्यकारी अभियंता राहुल पाटील, नवनाथ सोनवणे, मुकेश ठाकूर, उप अभियंता विजय बाविस्कर, उमाकांत कुमावत, राष्ट्रीय महामार्ग विभाग नाशिकचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. भोसले म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळादृष्टीने कामे दर्जात्मक होण्यासाठी त्र्ययस्थ पक्षाकडून कामांची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणानेही त्यांच्या स्तरावर या कामांची त्र्ययस्थ पक्षाकडून तपासणी केल्यास निश्चितच कामे गुणवत्तापूर्वक होतील. एच ए एल कडून सिंहस्थ कुंभमेळ्यात बाहेरून येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने ओझर विमानतळ येथील टर्मिनलचे अतिरिक्त बांधकाम विहित मुदतीत पूर्ण करावे. टर्मिनलचे बांधकाम करतांना प्रवासी संख्या, त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, प्रतिक्षागृह, सौंदर्यीकरण याचा प्रामुख्याने समावेश असावा.  त्र्यंबकेश्वर येथील दर्शन पथासाठी प्रस्तावित कामांना मंजुरी घेवून ते तातडीने सुरू करावे. येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षा घेता गर्दीमुळे व पावसाळी दमट हवेमुळे श्वसनाचा त्रास होवू नये यासाठी हवा खेळती राहील यादृष्टीने वायूवीजन रचना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पहिल्या टप्प्यातील 2200 कोटींच्या कामांना निधीची तरतुद झाली असून यात प्रामुख्याने शहराला जोडणारे रस्त्यांची कामे 18 महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे नियोजन करावे. दुसऱ्या टप्प्यात सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडून 570 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यात पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन यांच्याकडून आलेल्या सूचनेंनुसार रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. शहरातील द्वारका सर्कल येथे होणारी वाहतुकीची कोंडीच्या दृष्टीने सबवेचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यामातून होणार असल्याचे मंत्री श्री. भोसले यांनी सांगितले.

रस्त्यांची कामे करतांना आवश्यक भूसंपादन विहित पद्धतीने करण्यात यावे. कुंभेळात येणाऱ्या अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी अत्याधुनिक सेवा-सुविधा असेलेले पद्धतीचे नवीन शासकीय विश्रामगृहांचे काम संस्था निश्चित करून सुरू करण्यात यावे यासह जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असेलेली विश्रामगृहांची आवश्यक दुरूस्ती करण्यात यावी.  कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी  निवास व्यवस्थेसह बुलू टॉयलेटच्या संकल्पनेवर पुरूष व महिलांसाठी स्वच्छतागृहे साकारण्याचे काम करण्याचे प्रस्तावित असल्याचे मंत्री श्री. भोसले यांनी सांगितले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांनी सिंहस्थ कुंभमळा आराखड्यातील नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील प्रस्तावित व मंजूर कामांची माहिती दिली. बैठकीत ओझर विमानतळ येथील कामांचा आराखडा जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सादर केला तर अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा यांनी सार्वजनिक विभागाचा प्रस्तावित व मंजूर कामांचा आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आराखड्याचेही सादरकरण करण्यात आले.

सिंहस्थ कुंभमेळादृष्टीने नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता  तयार करतांना सुशोभिकरणावर भर द्यावा. तसेच ठिकाठिकाणी भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने लावण्यात येणारे दिशादर्शक फलक यांच्या आकारात एकसमानता असावी असे कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त श्री. सिंह यांनी सूचित केले.

बैठकीपूर्वी मंत्री श्री.भोसले यांनी घोटी-त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्ग एन एच 160अे ची पाहणी केली तसेच त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदीर येथे विधीवत दर्शन घेतले. यावेळी समवेत आमदार हिरामण खोसकर, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, तहसीलदार गणेश जाधव उपस्थित होते. शहरातील द्वारका सर्कलची पाहणी मंत्री श्री. भोसले यांनी  केली.

error: Content is protected !!
Exit mobile version