नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक नवा पर्व सुरू झाला आहे. स्थलांतर, गरीबी आणि रोजगाराच्या कमतरतेमुळे गाव सोडून दूरवर जाणाऱ्या हजारो कुटुंबांच्या समस्या आता स्थानिक पातळीवरच सोडवल्या जाणार आहेत. मा. पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली आणि मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने सुरू केलेला ‘मूळवाट’ हा उपक्रम ग्रामीण सक्षमीकरणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.
हंगामी स्थलांतरामुळे अनेकदा महिलांना आणि बालकांना आरोग्य आणि पोषणाच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु, जर रोजगार आपल्या गावातच उपलब्ध झाला, तर कोणालाही आपलं घर सोडावं लागणार नाही. यासाठी प्रशासनाने पुढील सहा महिन्यांसाठी मनरेगा अंतर्गत नियोजनबद्ध कामांची रूपरेषा तयार केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीकडे कामाची उपलब्धता निश्चित करण्यात आली असून, कामाच्या अभावामुळे स्थलांतर होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
तरीही स्थलांतर अटळ असल्यास, नागरिकांनी आपल्या ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी कार्यालयात मुखादमाचे नाव आणि गंतव्य जिल्ह्याचे नाव नोंदवावे. यामुळे स्थलांतराच्या ठिकाणी अडचण आल्यास प्रशासनाला तत्काळ मदत करता येईल.
प्रशासनाने कामाच्या ठिकाणी उद्भवणाऱ्या अडचणींसाठी दोन हेल्पलाईन क्रमांक सुरू केले आहेत:
या क्रमांकावर संपर्क साधून रोजगार, रेशन, आरोग्य सेवा किंवा अंगणवाडी सेवांशी संबंधित कोणतीही समस्या सोडवता येते. तसेच, ग्रामपंचायतीकडे काम उपलब्ध नसल्यास, कोणतीही सामाजिक संस्था किंवा शुभचिंतक थेट या हेल्पलाईनशी संपर्क साधू शकतात.
‘मूळवाट’ हा उपक्रम नंदुरबारच्या प्रत्येक नागरिकासाठी सशक्त भविष्याचा मार्ग आहे. प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आज ग्रामीण भागात रोजगार निर्माण होऊन गावोगावी आत्मनिर्भरतेचा नवा प्रवास सुरू झाला आहे.
जिल्हा प्रशासन तुमच्या सोबत खंबीरपणे उभं आहे. ‘मूळवाट’ उपक्रमाद्वारे आपल्या मातृभूमीला स्थलांतरमुक्त आणि समृद्ध बनवूया.
#Moolwat#Nandurbar#GramVikas#Employment#RuralDevelopment#MGNREGA#MigrationFreeVillages#TribalEmpowerment#NandurbarAdministration
