राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती दिल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने
1
On behalf of the state's farmers, for the loan waiver of up to two lakh rupees.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तुलसीहार, विठ्ठल- मूर्ती आणि बैलगाडीची प्रतिकृती भेट देऊन मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सन्मान करण्यात आला.राज्य शासनाने साडेसात हॉर्स पॉवरपर्यंत कृषीपंपांचे वीजबील माफ केले आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या नावावर पूर्वीची थकबाकी कायम असल्याने त्यांना नवीन वीज जोडणी घेण्यास अडचणी येत आहेत. यासाठी ४८ हजार कोटी रुपयांचे पूर्वीचे थकीत वीजबील माफ करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सन्मान सोहळ्यात केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीयोजना’ जाहीर केली आहे. जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५० हजार रुपयांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेमध्ये ५० हजार रुपयांचा लाभ देण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली असून या शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ मध्ये कर्जाची उचल करुन वेळेत परतफेड करण्याची अट सुद्धा रद्द करण्यात आली आहे.
राज्य शासन शाश्वत शेतीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. पीक कर्जमाफीसोबतच सिंचन प्रकल्प, जलसंचय, कोल्ड स्टोरेज, मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठ जोडणी यासाठी राज्याने हजारो कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुढील काही वर्षांत या गुंतवणुकीचा प्रत्यक्ष परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर दिसेल.
राज्यातील कृषी विद्यापीठे, सहकारी संस्था आणि खासगी क्षेत्र यांच्या भागीदारीतून नव्या तंत्रज्ञानाचा गावपातळीवर प्रसार करून शेती अधिक उत्पादनक्षम आणि नफा देणारी करण्याचे ध्येय राज्य शासनाने ठेवले आहे.
शेती क्षेत्रात केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळून यावर्षी ९५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक विविध योजनांद्वारे करण्यात येत आहे.
शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी इस्रायल फर्टिगेशन आणि पूर्ण ऑटोमेशन असलेले ठिबक सिंचन यासारख्या तंत्रज्ञानाचा आदर्श घेत ‘एआय’चा वापर सुरू केला आहे.
महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जलसाठा वाढविण्यात येत आहे.
सातारा–सांगली परिसरात दरवर्षी पूराचे पाणी वाहून जाते. वळण बंधाऱ्याच्या माध्यमातून हे पाणी मराठवाड्यात वळविण्याचा प्रयत्न आहे. आपण दुष्काळ पाहिला, परंतु पुढील पिढीला दुष्काळ पाहावा लागणार नाही, असा महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, आमदार रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, रणधीर सावरकर, संजय कुटे, खासदार अनिल बोंडे तसेच राज्याच्या विविध भागांतून आलेले शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.