Home शैक्षणिक दिवंगत वारकरी भोसलेंच्या मुलीच्या शिक्षणासाठी दरमहा ५ हजारांची वैयक्तिक मदत; पालकमंत्री चंद्रकांत...

दिवंगत वारकरी भोसलेंच्या मुलीच्या शिक्षणासाठी दरमहा ५ हजारांची वैयक्तिक मदत; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा संवेदनशील निर्णय

0
Personal monthly financial aid of ₹5,000 for the education of the late Warkari Bhosale's daughter; a compassionate decision by Guardian Minister Chandrakant Patil.

सांगली : पंढरपूर वारीदरम्यान दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांच्या कुटुंबीयांची राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत सांत्वन केले. शासन या दुःखाच्या प्रसंगी कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देत त्यांनी शासन नियमानुसार मिळणाऱ्या शासकीय मदतीबरोबरच कसबे डिग्रज येथील दिवंगत राजश्री भोसले यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी वैयक्तिक स्तरावर दरमहा पाच हजार रुपये देण्याची घोषणा केली.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी राजश्री शंकर भोसले (कसबे डिग्रज), नंदा बाबासो पवार (कवलापूर) आणि माधवी राजेंद्र सलगरे (मालगाव) यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. या दुःखद प्रसंगामुळे कुटुंबांवर कोसळलेल्या आघाताची दखल घेत त्यांनी त्यांच्या भावना समजून घेत धीर दिला. यावेळी खासदार विशाल पाटील, उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी मिरज उपविभागीय अधिकारी विशाल यादव, मिरज तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, सांगली अप्पर तहसीलदार अश्विनी वरूटे, महानगरपालिकेचे माजी उपमहापौर शेखर इनामदार आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. पाटील यांनी प्रशासनाला दिवंगत महिला वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून उपलब्ध असलेली सर्व मदत तत्परतेने मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे सांगितले. अशा कठीण प्रसंगी शासन संवेदनशीलतेने नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून विठ्ठल रखुमाई वारकरी योजनेंतर्गत 4 लाख रूपये व मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून 1 लाख रूपये असे एकूण 5 लाख रूपये त्वरीत मिळवून देण्यासाठीचे प्रस्ताव प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी राजश्री भोसले यांची बारावीत शिक्षण घेणारी मुलगी पुढे चार्टर्ड अकाउंटंट (सीए) होण्याचे स्वप्न पाहत असल्याचा उल्लेख करत, तिच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तिच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे दरमहा पाच हजार रुपये वैयक्तिक स्वरूपात जमा करण्यात येतील, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

भेटीदरम्यान उपस्थित लोकप्रतिनिधींनीही दिवंगत महिला वारकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. यावेळी संबंधित गावांचे लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.