Home शैक्षणिक ‘पायी पायी पाढे’ – चालत्या पावलांचा अभ्यास

‘पायी पायी पाढे’ – चालत्या पावलांचा अभ्यास

chaltya-pavlancha-aabhyas

दुर्गम आदिवासी भागात शिक्षणाची गंगा वाहवण्यासाठी शिक्षक अनेक नवनवीन प्रयोग राबवतात. धडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काल्लेखेतपाडा हिचा ‘पायी पायी पाढे’ हा उपक्रम याचाच एक प्रेरणादायी नमुना आहे.

या शाळेत सुमारे 260 विद्यार्थी विविध पाड्यांवरून रोज 3 ते 4 किलोमीटर पायी चालत शाळेत येतात. या प्रवासाचा केवळ शाळेत येण्याजाण्यासाठी उपयोग न करता, शिक्षकांनी तोच वेळ शिक्षणासाठी वापरण्याचा अभिनव प्रयोग सुरू केला.

उद्दिष्टे:

1. दुर्गम रस्त्यावरून येताना विद्यार्थ्यांनी हिंस्र व सरपटणाऱ्या प्राण्यांपासून सावध राहणे.

2. 1 ते 30 पर्यंतचे सरळ व उलटे पाढे पाठ करून घेणे.

3. चालण्याच्या वेळेचा शैक्षणिक उपयोग करून आकडेमोड कौशल्य वृद्धिंगत करणे.

4. लहान मुलांना मोठ्या मुलांकडून शिकण्याची संधी देणे.

5. सहशिक्षण व सर्जनशील शिकवण्याची संस्कृती तयार करणे.

उपक्रमाची रचना:

प्रत्येक विद्यार्थ्यांचा प्रवास मार्ग लक्षात घेऊन वेगवेगळे गट तयार करण्यात आले. प्रत्येक गटात एक ‘पाढा नेता’ निवडला गेला. शाळेत येताना हे सर्व गट तालासुरात पाढे म्हणत चालतात. कधी गाणी, कधी प्रश्नोत्तरे अशा विविध पद्धतींनी पाढ्यांचा सराव होतो. शिक्षक वेळोवेळी या गटांना मार्गदर्शन करतात व प्रगतीचा आढावा घेतात.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या पाढे पाठ करण्याच्या गतीत व अचूकतेत लक्षणीय वाढ झाली. लहान मुलांनी मोठ्या मुलांकडून पाढ्यांची लय, उच्चार आणि गती सहज आत्मसात केली. गणित विषयात आत्मविश्वास वाढला आणि शाळेची वेळ सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू झाला.

विशेष मार्गदर्शन:

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सावनकुमार साहेब व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. भानुदास रोकडे यांच्या मार्गदर्शनाने आणि गटशिक्षणाधिकारी श्री. डी. डी. राजपूत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असून, स्थानिक शिक्षकांनी तो यशस्वीपणे साकारला आहे.

‘पायी पायी पाढे’ हा उपक्रम शिक्षण आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालणारा, साधा पण प्रभावी प्रयोग आहे. दुर्गम भागातील शाळांसाठी तो एक प्रेरणादायी आदर्श ठरू शकतो.

#शैक्षणिकनवकल्पना ##नंदुरबार#धडगावशाळा#आदिवासीशिक्षण#mathlearning#EducationInnovation#nandurbareducation

error: Content is protected !!
Exit mobile version