
महापालिकेच्या हिरवळीवर हा विशेष समारंभ पार पडला. आपली बससाठी व्हॅाट्स ॲप तिकीट प्रणालीचा शुभारंभही यावेळी पार पडला.
जागतिक बँकेच्या अहवालानुसार येत्या दहा वर्षात नागपूर शहर जलदगतीने विकसित होत असून पायाभूत सुविधांच्या विकासामुळे शहराचा चेहरा बदलत आहे. एक वैश्विक शहर अशी नवी ओळख निर्माण होत असल्यामुळे नागपूरच्या सुनियोजित विकासासाठी निधी पडू दिला जाणार नाही. लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार स्वच्छतादूतांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांना महापालिकेने नियुक्तीपत्रे देण्यासोबतच त्यांच्यासाठी मोफत घरकुल देण्याची योजना राज्यात सर्वात प्रथम राबविली आहे. ३०० चौरस फुटांच्या मोफत घरांसोबतच अधिकच्या बांधकामासाठी अतिरिक्त शुल्क भरल्यास मोठे घर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहर स्वच्छ राहावे, आरोग्य चांगले राहावे, यासोबतच स्वच्छतादूतांच्या जीवनात परिवर्तन सुद्धा घडविण्यासाठी विशेष योजना राबविण्यात येत आहेत. नागपूरचा वेगाने होत असलेला विकास व त्यासोबतच पायाभूत सुविधा, उंच इमारती यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन महानगरपालिकेने स्वच्छतेच्या दृष्टीने प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी सफाई कामगारांच्या पाल्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शहराच्या विकासासोबतच स्वच्छता, खेळाचे मैदान व नागरिकांसाठी मुलभूत सुविधांचा विकास करताना येथील स्वच्छतेला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक प्रभागामध्ये खेळाची मैदाने, २४ तास पाणीपुरवठा तसेच बेरोजगार युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाला प्राधान्य द्यावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नीता ठाकरे, आमदार सर्वश्री मोहन मते, कृष्णा खोपडे, उपमहापौर लिला हाथीबेड, राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष शेरसिंह डागोर, स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी, महापालिका आयुक्त डॅा. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त मुरगनाथन एम., श्री. अंकित यांच्यासह विविध समित्यांचे सभापती, पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.