
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यास उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे मंदिर परिसरातील रस्ते, वाहनतळ, आरक्षण क्षेत्रांचा विकास आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार अक्कलकोट नगरपरिषद, सोलापूर जिल्हाधिकारी आणि म्हाडा यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.
या विकास आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी म्हाडाने सुमारे ५०० कोटींची तरतूद करण्याची तयारी दर्शविली आहे. याशिवाय, पालखी मार्ग, समाधी मंदिर परिसर, शहरातील वाहतूक व्यवस्था, तलाव व बगीचे तसेच परिसरातील अन्य सार्वजनिक सुविधांचा विकासही या नियोजनामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे अक्कलकोट तीर्थक्षेत्राचा विकास अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने होणार आहे.