नंदुरबार : वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकीदारांचा पुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणने सुरू केली आहे. जिल्ह्यात 69 हजार ग्राहकांकडे 222 कोटी रुपयांचे वीजबिल थकित आहे. ग्राहकांनी चालू बिलासह थकबाकी भरून सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
जिल्ह्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील एकूण 69 हजार 76 ग्राहकांकडे 222 कोटी 20 लाख रुपयांची थकबाकी आहे. यात घरगुती वर्गवारीतील 60 हजार 319 ग्राहकांकडे 13 कोटी 33 लाख, व्यावसायिक वर्गवारीतील 4 हजार 480 ग्राहकांकडे 2 कोटी 42 लाख, औद्योगिक वर्गवारीतील 623 ग्राहकांकडे 84 लाख, पथदिवे वर्गवारीतील 1441 ग्राहकांकडे 148 कोटी, सार्वजनिक पाणीपुरवठा वर्गवारीतील 880 ग्राहकांकडे 55 कोटी 70 लाख, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील 1333 ग्राहकांकडे 1 कोटी 90 लाख रुपयांची थकबाकी आहे. विभागनिहाय विचार करता विभागात 103 कोटी 74 लाख तर शहादा विभागात 118 कोटी 46 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र महावितरणतर्फे धडक वीजबिल वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली आहे.
मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, तांत्रिक कर्मचारी या मोहिमेत प्रत्यक्ष ग्राहकांकडे भेट देऊन थकबाकी वसुलीसाठी सरसावले आहेत. अनेक ग्राहक तातडीने बिल भरून सहकार्य करत आहेत. तर जे ग्राहक बिल भरण्यास प्रतिसाद देत नाहीत, त्यांचा वीजपुरवठा नाईलाजास्तव खंडित करण्याची कारवाई या मोहिमेत करण्यात येत आहे. तसेच थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही कुणी ग्राहक अनधिकृतरित्या वीज वापरत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सुट्टीच्या दिवशीही ही मोहीम सुरू आहे. दरम्यान, 1 एप्रिलपासून आजपर्यंत नंदुरबार विभागातील 3657 व शहादा विभागातील 3921 अशा नंदुरबार जिल्ह्यातील एकूण 7 हजार 578 ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी तात्पुरता खंडित करण्यात आला. तरी जिल्ह्यातील सर्व ग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिले भरून सहकार्य करावे व संभाव्य गैरसोय टाळावी, असे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए, मुलाणी यांनी केले आहे.
वीजबिल भरण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध
वीजबिल भरण्यासाठी महावितरणने अधिकृत वीजबिल भरणा केंद्रांसह विविध ऑनलाईन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. वीजबिलावरील क्यूआर कोड स्कॅन करून वीजबिल भरता येते. महावितरण मोबाईल ॲप, www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच विविध यूपीआय ॲपद्वारे घरबसल्या ऑनलाईन वीजबिल भरता येते. वेळेत ऑनलाईन वीजबिल भरल्यास 0.25 टक्के सूटही मिळते
डिस्कनेक्शनचा मनस्ताप व रिकनेक्श्नचा भुर्दंड टाळा
महावितरणने आपले वीज कनेक्शन तोडण्याची वाट न पाहता ग्राहकांनी चालू महिन्याच्या वीजबिलासह थकबाकीची रक्कम विनाविलंब भरून सहकार्य करावे. थकबाकीसाठी कनेक्शन तोडल्यास बिलाच्या रकमेसह पुनर्जोडणी शुल्क भरावे लागते. सिंगल फेज जोडणीसाठी 310 रुपये तर थ्री फेजजोडणीसाठी 520 रुपये पुनर्जोडणी शुल्क आकारले जाते. हा भुर्दंड टाळण्यासाठी वेळेत वीजबिल भरणे आवश्यक असल्याचे महावितरणने म्हटले आहे.
