Home महाराष्ट्र दिव्यांगांच्या हक्कांच्या प्रभावी संरक्षणासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तांची कार्यपद्धती निश्चित

दिव्यांगांच्या हक्कांच्या प्रभावी संरक्षणासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तांची कार्यपद्धती निश्चित

Procedures for the functioning of the Commissioner for Welfare of the Disabled have been fixed for effective protection of the rights of the Disabled.

मुंबई: दिव्यांग व्यक्तींचा सन्मान, हक्क, सुरक्षा आणि सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 अंतर्गत कलम 79 ते 83 नुसार आयुक्त, दिव्यांग कल्याण यांना ‘राज्य आयुक्त’ म्हणून अधिसूचित करण्यात आले असून, त्यांना न्यायालयीन अधिकार बहाल करण्यात आले आहेत. राज्य आयुक्तांच्या चौकशी, तपासणी आणि कार्यवाही प्रक्रियेला अधिक सुसूत्र आणि परिणामकारक करण्यासाठी मानक कार्यपद्धती तयार करण्यात आली असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

सचिव मुंढे म्हणाले, राज्य आयुक्त स्वतःहून (Suo Moto) किंवा प्राप्त झालेल्या तक्रारींवर कार्यवाही करू शकतात. दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही किंवा निर्देश देण्याचा अधिकार त्यांना आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम च्या कलम 82 नुसार, राज्य आयुक्तांना दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकार असतील. यामध्ये साक्षीदारांना समन्स पाठविणे, कागदपत्रे सादर करणे, शपथपत्रावर पुरावे स्वीकारणे तसेच तपासणीसाठी आयोग नेमण्याचे अधिकार समाविष्ट आहेत. त्यामुळे राज्य आयुक्तांसमोरील प्रत्येक कार्यवाही न्यायिक स्वरूपाची मानली जाईल.

राज्य आयुक्तांकडे दिव्यांग व्यक्ती, त्यांचे पालक किंवा कायदेशीर प्रतिनिधी तक्रार दाखल करू शकतात. तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रतिवादीस नोटीस देऊन त्यांचे म्हणणे मागवले जाईल. प्रतिवादीने 15 दिवसांत उत्तर सादर करावे लागेल, त्यानंतर 30 दिवसांत सुनावणी पूर्ण केली जाईल. सुनावणीसाठी दोन्ही पक्ष उपस्थित राहतील. सुनावणीसाठी प्रतिवादी उपस्थित राहिला नाही तर आयुक्तांना एकतर्फी निर्णय (Ex parte decision) घेण्याचा अधिकार असेल.

राज्य आयुक्तांच्या शिफारशींवर संबंधित प्राधिकरणाने कार्यवाही करणे बंधनकारक आहे. शिफारशीवर केलेली कार्यवाही किंवा कारणासहित नकार अहवाल 90 दिवसांत राज्य आयुक्तांकडे सादर करावा लागेल. एखाद्या प्राधिकरणाने राज्य आयुक्तांची शिफारस नाकारल्यास आणि जर नकाराची कारणमीमांसा योग्य नसल्याचे आढळले, तर राज्य आयुक्त शासनाकडे अहवाल सादर करतील.

राज्य आयुक्तांनी मागितलेली आवश्यक माहिती व अनुपालन अहवाल सर्व अधिकारी, प्राधिकरी यांना सादर करणे बंधनकारक असेल. राज्य आयुक्तांच्या निर्देशांचे पालन न केल्यास, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 च्या कलम 89 आणि कलम 93 अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यानंतर सुद्धा राज्य आयुक्तांच्या निर्देशाचे पालन न केल्यास संबंधित अधिकारी, प्राधिकारी यांच्याविरुद्ध प्रशासकीय तसेच शिस्तभंगात्मक कार्यवाही करण्यात येईल.

error: Content is protected !!
Exit mobile version