
नंदुरबार जिल्ह्यात महसूल विभागातील विविध प्रलंबित कामांच्या तातडीच्या निपटाऱ्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत तहसीलदार, सहाय्यक जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी विभागीय कामकाज वेगाने आणि कार्यक्षमतेने पूर्ण करण्यासाठी स्पष्ट निर्देश दिले.
बैठकीत शासकीय वसुली 100 टक्के पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला. रोह्यो अंतर्गत मजुरांचे ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक गावातील मागणीनुसार कामे उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी केली.
सर्वांसाठी घरी योजना अंतर्गत मंजूर घरकुलांसाठी प्रति लाभार्थी पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षण करून तत्काळ वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच वर्ग 2 ते वर्ग 1 मध्ये जमीन रूपांतरणाची प्रकरणे तातडीने निपटारा करण्यास सांगितले.
जिवंत सातबारा अभियानातील प्रकरणे मुदतीत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. नोंदणीकृत व अनोंदणीकृत नोंदी तसेच अनुसूचित जमातींच्या जमिनीशी संबंधित प्रलंबित विक्रीप्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले. कृषि क्षेत्रातील तंत्रज्ञानविषयक सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी ॲग्री स्टॅकची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सांगितले.
आपले सरकार पोर्टलवर प्राप्त तक्रारींची नियमित सुनावणी करून त्यांचा त्वरित निपटारा करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच मनुष्य/प्राणहानी झालेल्या कुटुंबांना तात्काळ मदत वितरण करण्याची सूचना करण्यात आली.
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटपासाठी आवश्यक जमिनीची मोजणी तातडीने करण्याचे, तसेच भूसंपादनासाठी प्रलंबित गटांची संयुक्त मोजणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
महसूल विभागाचे कामकाज गतीमान करण्यासाठी आणि नागरिककेंद्रित सेवा अधिक प्रभावीपणे देण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.
#Nandurbar#RevenueDepartment#DrMitaliSethi#NandurbarUpdates#GoodGovernance#Administration#MahsulVibhag#GovernmentSchemes#Roha#EGS#AapleSarkar#SardarSarovar#LandRecords #7_12 #AgriStack#Development#DistrictAdministration