Home महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख कोटीच्या निधीतून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार...

सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख कोटीच्या निधीतून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Road network to be built with a fund of Rs 1 lakh crore for the overall development of Solapur district – Union Minister Nitin Gadkari

सोलापूर : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख कोटीच्या निधीतून पुढील तीन वर्षात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

अक्कलकोट येथे आयोजित सोलापूर जिल्ह्यातील सहा प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमास कर्नाटक राज्याचे नियोजन व धोरण आयोगाचे उपाध्यक्ष बी. आर. पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, सोलापूर लोकसभा खासदार प्रणिती शिंदे, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, देवेंद्र कोठे, राजू खरे, महापौर विनायक कोंड्याल, राष्ट्रीय महामार्ग चे सचिव एस.जी. शेलार, राष्ट्रीय महामार्ग मुंबईचे विभागीय अधिकारी प्रशांत फेगडे, तांत्रिक सल्लागार संजय जयस्वाल आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की 2014 पर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी 565 किमी होती, ती आता 1750 किमीपर्यंत वाढली आहे. त्यावेळी 52 हजार कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन झाले होते, त्यापैकी सोलापूर शहरातील उड्डाणपुलाचे काम वगळले तर सर्व कामे पूर्ण केल्याचे सांगून पुढील तीन वर्षाच्या काळात सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख कोटीच्या निधीतून रस्ते विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर घेऊन ते पूर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यामध्ये जुना पुना नाका ते बोरामणी नाका रस्त्यासाठी 1020 कोटी, अहमदनगर सोलापूर कर्नाटक बॉर्डर पर्यंतच्या रस्त्यासाठी दहा हजार कोटी, राष्ट्रीय महामार्ग 65 वरील कामासाठी 48 कोटी, मुळेगाव येथील रस्त्यासाठी 35 कोटी अशा पद्धतीने रस्ते विकासाची कामे हाती घेतली जाणार आहेत. सुरत चेन्नई हा महामार्ग सोलापूर जिल्ह्याचे चित्र बदलणारे ठरेल. सोलापूर जिल्ह्यातील विविध महामार्गाच्या कामामुळे सोलापूर जिल्हा देशाच्या मध्यभागी येऊन देशाचा लॉजिस्टिक हब बनेल असेही केंद्रीय मंत्रीगडकरी यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी बुद्ध सर्किट हा 22 हजार कोटींचा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगितले. बोधिवृक्षाखाली मिळालेला अनुभव त्यांनी भावनिक शब्दांत मांडला. तसेच 12 हजर कोटींचा पालखी मार्ग 80% पूर्ण झाला असून मार्गावरील 46 तलाव बांधले गेले आहेत.  शेती व जलसंवर्धनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सोलर पंप व ड्रिप सिंचनामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होऊ शकते. पंढरपूर रिंग रोड, सोलापूर रिंग रोड, अक्कलकोट–दुधनी रस्ता यांसारख्या कामांना तसेच लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित केलेल्या सर्व कामांना मंजुरी दिल्याचे त्यांनी जाहीर केले. विकासकामांमध्ये राजकारण न करता सर्व समाजघटकांना समान लाभ मिळावा, हा त्यांचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आज भूमिपूजन होत असलेल्या सहा महामार्गामुळे अक्कलकोट येथे येणाऱ्या राज्याच्या विविध भागातील भक्तांना चांगल्या प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. तसेच अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात रस्त्याचे जाळे निर्माण झाल्याने या भागातील विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणेच अक्कलकोट गाणगापूर, मोहोळ ते वळसंग सोलापूर शहरात साठी रिंग रोड मंजूर करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. खासदार प्रणिती शिंदे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.

भूमिपूजन होणारे प्रकल्प पुढीलप्रमाणे : 

हसापूर ते बद्दाड किलोमीटरच्या रस्त्यासाठी पंधराशे 52 कोटीचा निधी.

वागदरी – अक्कलकोट – तोळणूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 बी चे पेव्हड शोल्डरसहित दुपदरीकरण. रस्त्याची लांबी 47.66 कि.मी. असून प्रकल्प खर्च  353 कोटी रुपये आहे.

मोहोळ – बसवनगर – वळसंग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 465 चे पेव्हड शोल्डरसहित दुपदरीकरण.  रस्त्याची लांबी 82.00 कि.मी. असून  प्रकल्प खर्च  756 कोटी रुपये आहे.

दुधनी येथे रेल्वे उड्डाण पूल बांधकाम तसेच रा.म.क्र. 150 ई च्या उर्वरित 4.122 कि.मी. रस्त्याचे उन्नतीकरण व दर्जोन्नतीकरण करण्यात येणार असून प्रकल्प खर्च 97 कोटी रुपये आहे.

रा.म.क्र. 150 ई अंतर्गत बोरी उमरगे येथे बोरी नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यात येणार असून लांबी 0.75 कि.मी. असून प्रकल्प खर्च  26 कोटी रुपये आहे.

या सर्व प्रकल्पांची एकूण लांबी 171 कि.मी. असून एकूण प्रकल्प किंमत 2784 कोटी रुपये आहे. या विकासकामांमुळे सोलापूर जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होऊन नागरिकांना सुरक्षित व जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पाचे फायदे… प्रस्तुत पॅकेज सुरत चेन्नई ग्रीन फील्ड कॉरिडॉरचा एक भाग आहे. यामुळे 390 किलोमीटर आणि सहा तासाच्या प्रवासाच्या वेळेचे बचत होणार आहे. वन्यजीव संरक्षण उपायोजनामुळे प्राण्यांच्या सुरक्षित प्रवासाची खात्री होईल. अक्कलकोट आणि गाणगापूर या तीर्थक्षेत्रापर्यंत पोहोचणे सुलभ होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 465 ह एक भाग सोलापूर साठी अतिरिक्त रिंग रोड म्हणून काम करेल. वाहतूक कोडी प्रवासाचा वेळ आणि इंधनाचा वापर कमी होईल. सोलापूर जिल्ह्यात कृषी पर्यटन उद्योग आणि रोजगार निर्मितीला यामुळे चालना मिळणार आहे.

प्रारंभी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने सहा महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

प्रास्ताविक महामार्ग प्राधिकरणचे सचिव एस.जी. शेलार यांनी करून रस्ते वाहतूक व महामार्ग प्राधिकरण मार्फत सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांची तसेच आज भूमिपूजन होत असलेल्या सहा कामांची माहिती दिली. मुंबईतील महामार्ग प्राधिकरण चे आर्थिक सल्लागार संजय जयस्वाल यांनी आभार मानले.

error: Content is protected !!
Exit mobile version