
नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल निर्मूलनाच्या दिशेने ठोस पावले उचलत आदर्श ग्राम अभियान अंतर्गत तळवे व पाचोराबारी ग्रामपंचायतींमध्ये सिकलसेल सप्ताहानिमित्त जनजागृती व तपासणी कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
तळवे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला. मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मा. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा सिकलसेल नोडल अधिकारी डॉ. हरिश्चंद्र कोकणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश वळवी व प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. योसेफ गावित यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमात सिकलसेल आजाराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली, तपासणी करण्यात आली तसेच वेळेवर निदान व उपचाराचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगण्यात आले. यावेळी 36 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. सिकलसेल रुग्णांसाठी उपलब्ध शासकीय योजना व लाभ यांची माहितीही देण्यात आली. कार्यक्रमात समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल पाटील, आरोग्य सेविका श्रीमती आर. के. पाडवी, आशा सेविका श्रीमती पुष्पा पाटील, मदतनीस श्रीमती रेखा पाटील आदी उपस्थित होते.
तसेच शनिवार, दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजीच ग्रामपंचायत पाचोराबारी – बारीपाडा येथेही आदर्श ग्राम अभियानांतर्गत सिकलसेल सप्ताह – जनजागृती व तपासणी कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात सिकलसेल आजाराची माहिती व तपासणी करण्यात आली. एकूण 53 लाभार्थ्यांची तपासणी झाली. वेळेवर निदान, उपचार आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका व सेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकवृंद, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दोन्ही कार्यक्रमांमुळे ग्रामीण भागात सिकलसेल आजाराबाबत जनजागृती वाढीस लागली असून, तपासणी व उपचारासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग दिसून आला. सिकलसेलमुक्त नंदुरबारच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.