
(नंदुरबार) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी विशेष सघन पुनरीक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision – SIR) 2026 राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरिकांच्या घरी भेट देऊन मतदारांच्या माहितीची पडताळणी करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक सहकार्य करून आपली माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी केले आहे.
मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा मूलाधार आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव यादीत समाविष्ट असावे, त्यातील माहिती अद्ययावत असावी आणि कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी हे विशेष पुनरीक्षण अभियान राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेमुळे नव्या मतदारांची नोंदणी, आवश्यक दुरुस्त्या आणि मतदार यादीचे शुद्धीकरण प्रभावीपणे होणार आहे.
असे आहे वेळापत्रक
• अर्हता दिनांक : 1 ऑक्टोबर 2026
• तयारी, प्रशिक्षण व छपाई : 20 जून ते 29 जून 2026
• बीएलओंच्या घरभेटी : 30 जून ते 29 जुलै 2026
• मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण : 29 जुलै 2026 पर्यंत
• प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी : 5 ऑगस्ट 2026
• दावे व हरकती स्वीकारणे : 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026
• दावे व हरकतींवरील कार्यवाही : 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर 2026
• अंतिम मतदार यादी प्रसिद्धी : 7 ऑक्टोबर 2026
मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा वगळण्याबाबत हरकत असल्यास संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांच्याकडे निर्धारित कालावधीत दावे अथवा हरकती सादर कराव्यात.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 आणि मतदार नोंदणी नियम, 1960 अन्वये राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेत सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी केले आहे.