Home महाराष्ट्र सुजलाम सुफलाम सावनेरच्या विकासाच्या दिशेने दमदार सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुजलाम सुफलाम सावनेरच्या विकासाच्या दिशेने दमदार सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Strong start towards the development of Sujalam Sufalam Saoner – Chief Minister Devendra Fadnavis

नागपूर: सावनेरच्या मुख्य रस्त्याचे सौंदर्यीकरण व मौनीबाबा आश्रमाचे भूमिपूजन आज झाले. खत आणि कोल गॅसिफिकेशन असे दोन मोठे प्रकल्प या भागात उभे राहणार आहेत यातून 40 हजारावर रोजगार निर्मिती होणार आहे. या सर्व प्रकल्पांमधून सुजलाम- सुफलाम सावनेर  होण्याच्या दिशेने सुरुवात झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. जगात युद्धाची परिस्थिती असताना भारत विश्वशांतीच्या दिशेने विचार करतो आणि विश्वशांतीसाठी विश्व महाआरतीचे सावनेर मध्ये झालेले आयोजन भूषणावह असल्याच्या भावना व्यक्त करून महाआरतीच्या गिनिज बुक ऑफ रेकॉर्डसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.श्री रामनवमीच्या पवित्र पर्वावर सावनेर नगरपरिषद मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती विश्वविक्रमी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच विकास कामांचे ऑनलाईन भूमिपूजनही त्यांचा हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्य मंत्री ॲड आशिष जयस्वाल,आमदार डॉ. आशिष देशमुख ,माजी मंत्री रणजित देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रभु राम हे आपले आदर्श आहेत. समाजात कोणी लहान मोठे नसून सर्व समान असल्याची शिकवण देऊन त्यांनी युगधर्म मांडला. त्याच प्रभु रामांच्या जन्मदिनी रामनवमीला सावनेरचा मुख्य रस्ता सौंदर्यीकरण प्रकल्प आणि रघवी समाजाचे थोर संत मौनीबाबा यांच्या आश्रमाचे बांधकाम व सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन झाले. सावनेर मतदार संघाचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी या भागात कोल गॅसीफिकेशन प्रकल्प आणि खत प्रकल्पसाठी केंद्र व राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा केला. येत्या काळात हे दोन मोठे प्रकल्प या भागात उभे राहणार असून याद्वारे जवळपास 40 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या सर्व कामांद्वारे या भागाच्या विकासाला चालना मिळेल व हा भाग सुजलाम- सुफलाम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.केंद्रीय रस्ते निधीच्या 26 कोटी रुपयातून सावनेर मुख्य रस्ता सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे तर 5 कोटी खर्चातून मौनीबाबा आश्रम उभारणी व सौंदर्यीकरण होणार आहे.तत्पूर्वी ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूल मंत्री तथा पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्यासह 4911 भक्तांनी गणपतीची महाआरती केली. याच कार्यक्रमात गिनीज बुक ऑफ रेकॉर्डच्या भारतातील अधिकाऱ्याने या महाआरतीचा हा  गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. आमदार डॉ आशिष देशमुख यांनी प्रास्ताविक केले.

error: Content is protected !!
Exit mobile version