Home नंदुरबार जिल्हा कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी 25 लाखांपर्यंत अनुदान;31 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे...

कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी 25 लाखांपर्यंत अनुदान;31 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

0
Subsidy of up to ₹25 lakh for pulse processing and packaging units; call to submit applications by July 31.

(नंदुरबार) सन 2026-2027 च्या ‘कडधान्य आत्मनिर्भरता अभियान’ योजनेंतर्गत कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनाला (Value Addition) चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने काढणीपश्चात पायाभूत सुविधा बळकट करण्यात येत आहेत. या अभियानांतर्गत कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिट्स उभारण्यासाठी प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल 25 लाख रुपयांपर्यंत आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, प्राथमिक कृषी पतसंस्था तसेच इच्छुक वैयक्तिक लाभार्थ्यांनी 31 जुलै 2026 पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

योजनेचे प्रमुख मुद्दे व निकष:

• अनुदानाचे स्वरूप: प्रत्यक्ष प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा 25 लाख रुपये (यापैकी जी रक्कम कमी असेल ती).

• जिल्ह्याचे लक्ष्य: नंदुरबार जिल्ह्यासाठी या घटकांतर्गत 01 युनिटचे भौतिक लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

• बँक कर्ज निगडित योजना: केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रीयकृत बँकेकडे कर्ज प्रस्ताव सादर करणे आवश्यक असून बँक कर्ज मंजुरीनंतरच योजनेचा लाभ मिळेल.

आवश्यक कागदपत्रे:

• संस्था/कंपनी/पतसंस्था: मागील ३ वर्षांचे ऑडिट अहवाल, नोंदणी प्रमाणपत्र, 7/12 व 8-अ उतारे.

• वैयक्तिक अर्जदार: 7/12 व 8-अ उतारा आणि वय किमान 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक.

एका कुटुंबातील (पती, पत्नी व अविवाहित मुले) केवळ एकाच व्यक्तीला लाभ मिळेल. प्रकल्प खर्चाच्या किमान 15 टक्के रक्कम व कार्यभांडवलासाठी आवश्यक मार्जिन मनी उभारण्याची आर्थिक क्षमता अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. किरवे यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.