रांझणी ता. तळोदा येथे सुरू असणाऱ्या कर्मण्य महोत्सवाचा पारितोषिक वितरण कार्यक्रमाने सोमवारी समारोप झाला. या महोत्सवात १५०० विद्यार्थी सहभागी झाले होते.
श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने रांझणी येथिल विद्यावर्धिनी निवासी आश्रम शाळेत तीन दिवसीय कर्मण्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा,संस्कृती, व अध्यात्म यांच्या दर्शन घडवले. शुक्रवारी विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तळोदा शहराचे माजी नगराध्यक्ष अजय परदेशी होते प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक राजन मोरे नगरसेवक शिरीष माळी रवींद्र मोराणकर दगडू शिरोळे प्रकाश शिरोळे डॉ स्वप्निल बैसाणे,संजय वाणी,आदीसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कोठार व रांजणी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांच्या दरम्यान विविध वयोगटात झालेल्या सांघिक कबड्डी खो-खो लांब उडी उंच उडी भालाफेक थाळीफेक गोळा फेकचित्रकला रांगोळी, सांस्कृतिक कलाविष्कार अशा विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन देऊन सन्मानित करण्यात आले. क्रीडा स्पर्धांमध्ये २०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. अध्यक्ष भाषणात नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी सांगितले की, क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी बघून आम्हाला बालपण आठवले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये संस्थेचे मोठे योगदान असून असे नावीन्यपूर्ण उपक्रमांमध्ये संस्थेने आपली ओळख निर्माण केली आहे. पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षा व शिस्त याबद्दल मार्गदर्शन केले. समारोपच्या भाषणांमध्ये डॉ.शशिकांत वाणी यांनी आपल्या आई विषयीच्या आठवणींना उजाळा देत त्यांना अभिवादन केले. सोबतच पहिल्याच प्रयत्नात महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व यंत्रणा व कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. महोत्सवाच्या समारोप्रसंगी विद्यार्थी आदिवासी गाण्यावर थिरकतांना दिसले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.शशिकांत वाणी, उपाध्यक्ष रमेश वाणी, सचिव गुलाबराव चव्हाण,मानद सचिव सी एस पाटील, संचालिका सुनिता वाणी,आदित्य मालपुरे,अभिषेक मालपुरे, रविंद्र वाणी,जगन मराठे यांच्यासह आश्रम शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
