
अमरावती : गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज उपस्थित होते. यावेळी गुरुकुंज मोझरी आश्रम परिसरात मान्यवरांसह भव्य जनसमुदयामार्फत स्वयंसंचलित मौन बाळगून शांततेत अत्यंत श्रद्धेय भावनेने मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी सामुदायिक प्रार्थना, ध्यान तसेच आरती केली.
खासदार डॉ अनिल बोंडे, बळवंत वानखडे, आमदार राजेश वानखडे, गजानन लेवटे, प्रताप अडसड, नवनीत राणा, प्रवीण पोटे-पाटील, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जनार्दन बोथे गुरुजी, पुष्पाताई बोंडे, दिनेश सूर्यवंशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मौन श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम स्थळी तबला, पेटी शंखनाद या पारंपारिक वाद्यांसह सर्वधर्मीयांच्या प्रार्थना सामूहिक रित्या म्हणण्यात आल्या. डॉ. तिवारी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जीवनपट यावेळी कथन केला.
मौन श्रद्धांजली कार्यक्रमासाठी देशभरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले असून देश-विदेशातील नागरिकही उपस्थित होते. पुण्यतिथी कार्यक्रम निमित्त येथे मोठी यात्रा भरलेली असून गावागावातून दिंड्या कार्यक्रम स्थळी आल्या होत्या.