फलोत्पादन पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापनासाठी राबविण्यात येणाऱ्या कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन (हॉर्टसॅप) योजना सन 2025–26 अंतर्गत शहादा तालुक्यातील कुकावल येथे केळी पिकावरील सिगाटोका रोगाविषयी गावस्तरीय शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये गावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना सिगाटोका रोगाची लक्षणे, त्याचा पिकावर होणारा परिणाम तसेच प्रतिबंध व नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शास्त्रीय पद्धतीने रोग व्यवस्थापन केल्यास केळी उत्पादनात गुणवत्ता व उत्पादनवाढ कशी साधता येईल, याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
या गावस्तरीय प्रशिक्षणास सरपंच श्री. जयवंत पाटील तसेच प्रगतशील शेतकरी राहुल सनेर, धिरज सनेर, युवराज पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
प्रशिक्षणादरम्यान मंडळ कृषी अधिकारी, कळंबु श्री. आर. एच. बाविस्कर, उप कृषी अधिकारी, कळंबु–1 श्री. सी. एम. माळी आणि कृषीसेवक श्री. तेजस कुवर यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी उपस्थित प्रश्न व अडचणी मांडल्या असता तज्ज्ञांनी त्यावर योग्य सल्ला दिला.
या उपक्रमामुळे केळी पिकावरील सिगाटोका रोगाविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढून, उत्पादन खर्च कमी करत शाश्वत व लाभदायक शेतीकडे वाटचाल होण्यास मदत होणार आहे.
(Collector Office Nandurbar)
