आमचे जुने सहकारी टी. ए. जाधव (सेवानिवृत्त अधिकारी), यांची बऱ्याच दिवसांनी आज रोजी त्यांच्या उल्हासनगर स्थित, एसटी बस मॉडेल बनविण्याच्या कारखान्यास सदिच्छा भेट दिली.
मला आठवतं की, ९ वर्षांपूर्वी यांच्या या कारखान्यास मी भेट दिली होती. तेव्हाचा सेटअप फार छोटाच होता, पण आता वाढती मागणी पाहता, त्यांनी त्यांचा विस्तार फार मोठ्या प्रमाणात केला असून, त्यांच्या आवडीतून त्यांनी आपला हा कारभार वाढविल्याचे समाधान वाटते.
सेवानिवृत्त होऊन देखील, एखादा कर्मचारी शांत न बसता आपली कला जोपासत, माफक दरात एसटीचे मॉडेल प्रत्येक घराघरात तसेच प्रत्येक एसटी कर्मचारी वर्गाकडे कसे संग्रही राहील, याचा दरवेळी विचार करणाऱ्या जाधव काकांकडे नफा तोट्याचे गणित नाही हे विशेष !
पूर्वी फक्त एसटीचे मॉडेल बनवता बनवता, त्यांना आता नवी मुंबई परिवहन, ठाणे परिवहन, बेस्ट परिवहन इ. ठिकाणाहून ऑर्डर येत असून, खाजगी बसेसची देखील बस मॉडेल त्यांनी मागणीप्रमाणे मोठ्या प्रमाणात बनवले आहेत.
एकाच वेळी १००० पर्यंत मॉडेल, एकाच ठिकाणी तयार करू शकणाऱ्या या कारखान्यात, त्यांनी बरीच R & D (विकास आणि संशोधन) केली असून, ९५% बसचे मॉडेल बनवण्याची सामग्री ते स्वतः तयार करतात हे विशेष !
संपूर्ण पत्र्याचे मॉडेल असल्याने, वेगवेगळ्या मॉडेलसाठी लागणारे डाय, पत्रा कापण्याची मशीन, लाइट्स, खिडक्या, मोल्ड ते स्वतः तयार करत असून, उत्पादनाची किंमत, कमीत कमी कशी होईल याकडे त्यांनी अगदी पाहिल्यापासूनच लक्ष दिले आहे आणि म्हणूनच त्यांचे मॉडेल हे इतर मॉडेल बनवणाऱ्या कोणत्याही कलाकाराने बनवलेल्या मॉडेलपेक्षा फार स्वस्त आहेत, याचा मला इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो !
कारखान्यासाठी लागणारी जागा, साधनसामग्री, मनुष्यबळ यासाठी तब्बल २० लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक करून, आपल्या छंदाला आणखीन उत्तुंग शिखरावर घेऊन जाण्यासाठी, जाधव काका त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह या व्यवसायात असून, गणपतीसणानिमित्त विविध बस स्थानकात तयार करणाऱ्या एसटी देखाव्याची संकल्पना देखील त्यांनी उत्तम प्रकारे मांडली आणि त्यांस विविध भागातून प्रतिसाद देखील मिळत आहे.
भविष्यात जाधव काकांना या कार्यात उत्तुंग यश लाभो, याच सदिच्छा !
त्रिमुर्ती लघु उद्योग
टी. ए. जाधव : ७७५६८०४४४१
