Home सरकारी योजना विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार...

विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

0
We will make the necessary funds available for development works – Rural Development and Panchayat Raj Minister Jaykumar Gore.

सांगली : मिरज तालुका पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, पारदर्शक आणि जलद शासकीय सेवा उपलब्ध होतील. उर्वरित कामे व विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी आज केले.

मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री तथा आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, माजी आमदार दिनकर पाटील, मिरजचे प्रभारी गटविकास अधिकारी किरण सायमोते, सहाय्यक गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर मडके आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण झाल्याचे जाहीर करून ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, प्रत्येक बेघराला घरकुल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेऊन शासनाने एका वर्षात जवळपास ३० लाख घरकुले मंजूर केली आहेत. त्यापैकी साडेसहा लाख घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देणे किंवा ते शक्य नसेल तर जमीन उपलब्धतेसाठी एक लाख रुपये देणे, तसेच प्रत्येक घरावर सौर पॅनेल बसविणे, अशा विकासाभिमुख भूमिकेतून राज्य शासन विविध निर्णय घेत आहे. सांगली जिल्ह्यात ४२ हजार घरकुले मंजूर असून त्यापैकी १८ हजार घरकुले पूर्ण झाली आहेत. याचबरोबर मिरज तालुक्यातील विविध तीर्थक्षेत्रांचा दर्जा उन्नत करून कोट्यवधी रुपयांचा निधी तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या माध्यमातून आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील विविध महामार्गांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, आधुनिक कार्यालयीन सुविधा उपलब्ध झाल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काम अधिक गतिमान होईल. मिरज पंचायत समितीच्या जोड इमारतीसह अन्य उर्वरित कामांसाठी लागणारा जवळपास सव्वा आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच पंचायत समितीच्या जुन्या इमारतीची दुरुस्ती व सभागृहाचे नूतनीकरण करण्यात येईल. राज्य शासन विविध विकासकामांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठीशी असून मिरज तालुक्यातील विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देईल, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सांगली जिल्ह्याने केलेल्या कामाचे कौतुक केले आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

आमदार डॉ. सुरेश खाडे म्हणाले, राज्य शासन सर्वसामान्य जनता व बळीराजाच्या हिताचे निर्णय घेत असून दोन लाख रुपयांपर्यंतच्या सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर म्हैसाळ योजनेच्या थकीत वीजदेयक प्रकरणी सकारात्मक निर्णय घेऊन योजनेचे पाणी दुष्काळग्रस्त भागाला उपलब्ध करून देण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास होणार आहे. तसेच तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी राज्य शासनाने भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीमुळे नागरिकांना एकाच छताखाली विविध सेवा सुलभपणे उपलब्ध होतील, असे सांगून त्यांनी नवीन जोड इमारत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व अन्य कामांसाठी आवश्यक सव्वा आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा शेतकरी पाणंद रस्ते योजना, लाडकी बहीण योजना, विविध महामार्ग अशा अनेक जनहिताच्या निर्णयांचा उल्लेख करून तळागाळातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम शासन करीत असल्याचे सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे व बजरंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले तसेच प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी केली.

प्रास्ताविक प्रभारी गटविकास अधिकारी किरण सायमोते यांनी केले, तर ज्ञानेश्वर मडके यांनी आभार मानले. विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले.

प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमास महापालिकेचे गटनेते निरंजन आवटी, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, पृथ्वीराज पाटील, अरविंद तांबवेकर, आमदार डॉ. सुरेश खाडे यांच्या सुविद्य पत्नी सुमन खाडे, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन पंचायत समिती प्रशासनाने केले.