Home महाराष्ट्र बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी दीडशे कोटींच्या आराखड्यास मंजुरी

बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी दीडशे कोटींच्या आराखड्यास मंजुरी

Approval for a plan of Rs 150 crore for the development of tourism at Biroba Devasthan

सांगली : प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा देवस्थानचा 149 कोटी 75 लाख रूपये खर्चाचा पर्यटन विकास सुधारित बृहत आराखडा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी राज्य शासनास पाठवण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री पाटील यांनी दिल्या.

कवठेमहांकाळ तालुक्यातील मौजे आरेवाडी येथील श्री बिरोबा देवालय ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे व पायाभूत सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या पर्यटन विकास आराखड्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्र, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, वास्तु विशारद प्रमोद चौगुले, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुंडलिक उबाळे आदि उपस्थित होते.

बिरोबा देवालय आरेवाडी येथे पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणावर देवदर्शनासाठी येतात. यात्रा काळात साधारणत: दीड ते दोन लाख भाविक दर्शनासाठी 2 दिवस मुक्कामास असतात. पर्यटन विकास आराखड्याच्या कामाच्या माध्यमातून पर्यटकांची मोठी सोय होऊन बिरोबा देवस्थान हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेला हा सुधारित आराखडा राज्य स्तरावर पाठवावा. तेथे या आराखड्यास मंजुरी मिळण्यासाठी पाठपुरावा करू, असे यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले,

‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी डोर्मेटरी भक्त निवास, दुकानगाळे, जमीन सपाटीकरण व जमीन सुधारणा, सायकल, मोटर सायकल स्टँड / कार पार्किंग, इतर बांधकामे इत्यादी साठीचा शासनाकडून जस-जसे निधी प्राप्त होईल त्यानुसार सदरची कामे क्रमाने पूर्ण करण्यात येत आहेत. श्री बिरोबा देवालय आरेवाडी येथील देवस्थान ठिकाणी सन 2010-11 ते सन 2017-18 या कालावधीत जवळपास 8 कोटी रकमेची कामे पूर्ण झाली आहेत. सन 2024-25 मध्ये ‘ब’ वर्ग तीर्थ क्षेत्र योजनेंतर्गत एकूण 3 कोटी 98 लाख रूपये रकमेची 2 कामे मंजूर असून निविदा प्रक्रिया होऊन कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. या मंजूर रकमेची कामे वगळून सुधारित बृहत विकास आराखडा 149 कोटी 75 लाख रूपये रक्कमेचा प्रस्ताव यावेळी सादर करण्यात आला. या सुधारित बृहत विकास आराखड्यांतर्गत सुविधा इमारती (सामान्य सुविधा केंद्र, प्रशासकीय इमारती, डॉरमेटरी, दुकाने, फर्निचर काम इत्यादी), मुख्य मंदिर दुरूस्ती, आंतरिक जलपुरवठा प्रणाली, विद्युत काम आंतरिक व बाह्य, अग्निशमन प्रणाली, रस्ता बांधकाम, आरसीसी कंपाउंड वॉल, सांडपाणी व्यवस्थापन, पावसाचे पाणी संकलन, भूमी विकास कामे व इतर अन्य कामांचा समावेश आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version