Home महाराष्ट्र इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया : नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया : नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

Class XI admission process: Schedule for regular second round announced

मुंबई : राज्यातील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ अंतर्गत नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून विद्यार्थ्यांना ६ जून ते ९ जून २०२६ या कालावधीत नवीन नोंदणी, अर्जातील दुरुस्ती तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या पसंतीक्रमाची नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिली आहे.

राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १२ लाख ५१ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ४ लाख ५१ हजार ५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. आता नियमित दुसऱ्या फेरीची प्रक्रिया ६ जूनपासून सुरू होणार आहे.

नियमित दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना ६ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्जाचा भाग-१ दुरुस्त करण्यासह भाग-२ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येतील. अर्ज लॉक करणे अनिवार्य राहणार आहे. १० ते १२ जूनदरम्यान प्रवेश वाटप प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर १३ जून रोजी सकाळी १० वाजता दुसऱ्या फेरीची प्रवेश वाटप यादी, कट-ऑफ यादी आणि संबंधित माहिती पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही माहिती पाठविण्यात येणार आहे.

प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना १३ जून रोजी दुपारी १२ वाजल्यापासून १६ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात कागदपत्र पडताळणी करून प्रवेश निश्चित करता येणार आहे. याच कालावधीत महाविद्यालयांकडूनही प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या फेरीतील सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १८ जून रोजी पुढील फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. तसेच १९ जून रोजी सकाळी ११ वाजता रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सर्व कार्यवाही वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा, असेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version